वर्षअखेपर्यंत कार्यान्वित; आगामी काळात ५०० बसचा प्रस्ताव

पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ‘बेस्ट’च्या ताफ्यात या वर्षअखेर पर्यावरणस्नेही ८० बस दाखल होणार आहेत. तसेच मध्यम आणि लहान आकाराच्या ४५० बसदेखील ‘बेस्ट’मध्ये दाखल होतील अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी दिली.

‘शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक दळणवळण’ या विषयावर शनिवारी झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. प्रदूषण नियंत्रण महामंडळ, सीएसआयआर, ‘नीरी’ आणि ‘मुंबई फर्स्ट’ यांनी संयुक्तपणे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. पुढील काळात विजेवर चालणाऱ्या आणखीन ५०० बस आणि मध्यम व लहान आकाराच्या एक हजार बससाठी लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. भविष्यात होणाऱ्या ‘मेट्रो’च्या स्थानकांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गिकांवर लहान आकाराच्या बसचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेचे उद्घाटन करताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी, शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेची गरज अधोरेखित केली. वायुप्रदूषण स्रोतांच्या विश्लेषणात्मक अहवालानुसार वाहन प्रदूषण हे मुख्य कारण असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. अंदाजे ३० टक्के वायुप्रदूषण हे वाहनांमुळे होत असल्याचे यातून दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

महानगर प्रदेशातील मेट्रोच्या २०४१ पर्यंतच्या विस्ताराबद्दल एमएमआरडीएच्या संचालक के. विजयालक्ष्मी यांनी माहिती देत महानगर प्रदेशात तब्बल ४६७ किमीचे जाळे या काळात उभे केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मेट्रो ३’ प्रकल्पाचे काम वेगात पूर्ण होत असून भुयारीकरणाचे काम ५० टक्के पूर्ण झाल्याचे एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणातून मांडले.

पर्यावरणपूरक दळणवळणासाठी इतर उपायांबरोबरच व्यापक प्रमाणात पादचाऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करण्याची गरज नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी व्यक्त केली. शहरांमध्ये मोठय़ा समूहाला वाहनांशिवाय प्रवास करण्यासाठी पदपथ तसेच सायकलसाठी सुविधा उपलब्ध करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

विजेवर धावणाऱ्या वाहनांची पुढील काळातील गरज दिवसभराच्या सादरीकरणातून अधोरेखित केली गेली, मात्र त्याचबरोबर सध्या कार्यरत असणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ठरावीक काळाने तपासणी होणे गरजेचे आहे, असे मत ‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी व्यक्त केले. विजेवर धावणाऱ्या वाहनांना काही मर्यादा असून अवजड वाहतुकीसाठी हायब्रीड पर्याय अधिक हितकारक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘नीरी’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ नितीन लाभसेटवार यांनी प्रदूषण नियंत्रण वाहन चाचणी (पीयूसी) सध्या समाधानकारक पद्धतीने होत नसल्याचे सांगत त्यामध्ये सुधारणा करायची गरज व्यक्त केली. तसेच वाहन प्रदूषणाबाबत ‘तपासणी आणि प्रमाणीकरण’ या यंत्रणेचे प्रशिक्षण सर्व गॅरेजेसना द्यावे लागेल असे लाभसेटवार यांनी सांगितले. सध्या ही यंत्रणा राज्यात केवळ नाशिक येथे असून देशभरात ४५ ठिकाणी उपलब्ध आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव यांनी दिवसभराच्या चर्चेचे सार समारोपाच्या भाषणात मांडले. टाटा पॉवर आणि टाटा मोटर यांच्यातर्फे विजेवर धावणारी वाहने आणि त्यांच्या ऊर्जा पुरवण्याच्या यंत्रणेची माहिती दिली.