सर्वोच्च न्यायालयाने हरित फटाक्यांचा आग्रह धरला असला तरी अपुरा पुरवठा आणि अवाच्या सवा किमती यांमुळे हे फटाके सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे ठरत आहेत. साध्या फटाक्यांच्या तुलनेत पर्यावरणस्नेही फटाके महाग असल्याने ग्राहक प्रदूषणकारी फटाक्यांनाच पसंती देत आहेत.

फटाक्यांमध्ये कोळसा, सल्फर, बेरियम आणि पोटॅशियम नायट्रेट या हानीकारक घटकांचा वापर होतो. फटाके हवा प्रदूषित करत असल्याने अनेकांना श्वसनाचे आजार बळावतात. दिल्ली एनसीआर परिसरात ऑक्टोबर, २०१७ मध्ये फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने हरित फटाक्यांचा आग्रह धरला. फटाक्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणस्नेही फटाक्यांसाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) आणि केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद यांच्या माध्यमातून संशोधन सुरू होते. फटाक्यांमधील घातक असा बेरीयम हा घटक नष्ट करण्यात त्यांना मागील वर्षी यश मिळाले. मात्र, बाजारात या हरित फटाक्यांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी असल्याने त्यांच्या किमती जास्त आहेत.

बाजारात सामान्य फुलबाजी १०० ते २०० रुपयांदरम्यान उपलब्ध आहे. मात्र हरित फुलबाजीचे दर ३०० ते ४०० रुपये आहेत. नव्याने बाजारात आलेले हरित फटाके मागणीच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती चढय़ा आहेत, असे ठाण्यातील विद्याधर शिंदे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी हरित फटाके तयार करण्याची   परवानगी फक्त १६ उप्तादकांना मिळाली होती. अजूनही शास्त्रज्ञ आणि संशोधक हे हरित फटाक्यांच्या परिणामांची तपासणी करत आहेत. मुळात उत्पादन कमी असल्याने बाजारात कमी फटाके आहेत. बाजारात बोधचिन्ह आणि क्यूआर कोड असलेल्या फटाक्यांची नागरिकांनी खरेदी करावी, असे मुंबई आणि ठाणे जिल्हा फटाके डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष नवीन चांडवा यांनी सांगितले. तमिळनाडूमधील शिवकाशी या गावात फटाके मोठय़ा प्रमाणावर तयार केले जातात. शिवकाशी शहर आणि आजूबाजूच्या शहरात १००० कारखाने असून ६ कोटींच्या वर उलाढाल होते. या वर्षी तेथील काही कारखान्यात हरित कारखाने तयार करण्यास सुरुवात झाली आहे. उत्पादकांनी नवीन फटाक्यांचे उत्पादन केलेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षीचा माल किरकोळ विक्रेते कमी किमतीत विकत असल्याचे निदर्शनास येत आहे.

समाजमाध्यमावरून फटाक्यांची विक्री

सध्या संकेतस्थळांवरही फटाक्यांची विक्री सुरू आहे. परंतु त्याला अत्यल्प प्रतिसाद आहे. ऑनलाइन संकेतस्थळांवर फुलबाजा २५० रुपये, चक्री ४०० रुपये, तर अनार ३५० रुपयांस उपलब्ध आहेत. बाजारात बंदूक २०० ते ५०० रुपये, चक्री २५० रुपये, पाऊस १५० रुपये, फुलबाजा ३०० रुपये, चिटपुट ३० रुपयाला उपलब्ध आहेत. याचबरोबर रेनबो रॉकेट १५० रुपये, लवंगी २०० रुपये, सुतळी बॉम्ब ३०० रुपये, आणि आकाशात चमकणाऱ्या विविध रंगाच्या फटाक्यांची किंमत ५०० ते १००० रुपयांपर्यंत आहे.