विजेवरील दुचाकींच्या विक्रीत सप्टेंबर महिन्यात ७२ टक्क्यांची वाढ

मुंबई : करोनामुळे सार्वजनिक वाहतुकीऐवजी स्वत:चे वाहन घेण्याचा कल वाढत असताना त्याचा फायदा पर्यावरणपूरक दुचाकी वाहनांना होत आहे. टाळेबंदीकाळात अगदीच ठप्प पडलेल्या विजेवरील (इलेक्ट्रिक) दुचाकींच्या विक्रीने शिथिलीकरणानंतर म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यांमध्ये देशभरातच उसळी घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात २,५४४ विजेवरील दुचाकींची विक्री झाली असून ही वाढ गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ७२ टक्के आहे. गेल्या वर्षी याच सुमारास १४७३ विजेवरील दुचाकींची विक्री झाली होती.

वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा विषय कायमच चर्चेत असतो. त्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक अशा विजेवरील दुचाकी बाजारात आल्या आहेत. टाळेबंदीनंतर बाजारात दुचाकींची मागणी पुन्हा वाढू लागली असली तरी गतवर्षीची पातळी अद्याप गाठली नाही. त्याच वेळी विजेवरील दुचाकींच्या खरेदीला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

टाळेबंदीचा मोठा फटका विजेवरील वाहनांच्या उद्योगाला बसला होता. एप्रिल महिन्यात देशभरात विजेवरील ६७ दुचाकींची विक्री झाली. मात्र आता विक्रीने जोर पकडला असून गतवर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये विक्रीत ३३ टक्के , तर सप्टेंबरमध्ये ७२ टक्के  वाढ झाल्याचे ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅ क्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स’च्या (एसएमईव्ही) अहवालातून समोर आले आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये १,७९३ विजेवरील दुचाकींची विक्री झाली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ती १,३४३ होती. कमी अंतरावरील प्रवासासाठी या पर्यावरणपूरक वाहनांना मागणी असते. छोट्या शहरात जवळच्या प्रवासासाठी विजेवरील दुचाकींना पसंती मिळत आहे. ‘टाळेबंदी शिथिलीकरणाबरोबर विजेवरील दुचाकींची वास्तव मागणी समोर येत आहे. पर्यावरणाबाबत जागरूक असणारे नागरिक आणि युवा वर्गाकडून विजेवरील वाहनांना मागणी आहे. या क्षेत्राला मदत व्हावी, यासाठी विजेवरील दुचाकीच्या नवीन बॅटरी खरेदीवर आकारण्यात येणारा जीएसटी दर १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करावा,’ अशी मागणी सोसायटी ऑफ मॅन्युफॅ क्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे महासंचालक सोहिंदर गिल यांनी केली आहे.

सणासुदीला विक्री वाढण्याची आशा

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विक्री वाढली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत पहिल्या सहामाहीतील विक्री अद्यापही सुमारे २५ टक्क्यांनी रोडावलेली आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत १०,१६१ विक्री झाली. यंदा ती ७,५५२ पर्यंत घटली आहे. परिणामी पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत या उद्योगाला झालेले नुकसान आगामी सणांतील विक्रीतून भरून निघेल, अशी आशा उद्योगविश्वातून व्यक्त होत आहे.