X
X

पर्यावरणस्नेही मखरे थर्माकोलपेक्षा स्वस्त

सध्या बाजारात कापडी मखरांना मोठी मागणी आहे. काठय़ांच्या साच्यावर हे मखर अंथरले जाते.

गणेशोत्सवात यंदा कापडी मखरांना अधिक मागणी

प्लास्टिकबंदीनंतर ऐन गणेशोत्सवात आलेल्या थर्माकोल बंदीमुळे ग्राहकांना घरी येणाऱ्या गणेशाचे स्वागत कसे करायचे हा प्रश्न पडला होता. मात्र बाजारात थर्माकोलला पर्याय म्हणून पर्यावरणस्नेही मखरांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आणि थर्माकोलच्या मखरांपेक्षा पर्यावरणस्नेही मखरांचे दर खिशाला परवडतील असे असल्याने ग्राहकांचा मोर्चा या मखरांकडे वळला आहे. कागद, कापड आणि लाकडापासून तयार केलेल्या मखरांचे वैविध्यपूर्ण पर्याय बाजारात उपलब्ध झाले आहेत.

सध्या बाजारात कापडी मखरांना मोठी मागणी आहे. काठय़ांच्या साच्यावर हे मखर अंथरले जाते. रंगीबेरंगी कापडांवर विविध प्रकारच्या टिकल्या लावून ते सजवले जाते. मखराच्या आत गवताच्या लाद्या घातलेल्या असतात. दरवर्षी थर्माकोलचे मखर खरेदी करणाऱ्या गिरगावच्या रुचिरा जगताप सांगतात, २ फुटाच्या मूर्तीसाठी थर्माकोलचे ५ फुटी मखर घेण्यासाठी त्यांना जवळजवळ ५ हजार रुपये मोजावे लागत होते. पण या वर्षी त्यांनी खरेदी केलेल्या कापडी मखराची किंमत १८०० रुपये आहे. गणेश विसर्जनानंतर कापडी मखर धुऊन घडी करून ठेवता येते. त्यामुळे पुढच्या वर्षी त्याचा पुनर्वापर करता येईल.

थर्माकोलप्रमाणेच मखर हवे असेल तर कठीण स्वरूपाच्या कागदापासून तयार केलेले मखर हे उत्तम पर्याय आहेत, असे ‘विघ्न क्रिएशन्स’चे सौरीन शाह सांगतात. त्यावर पाणी पडले तरी ते पुसून टाकता येते. यामध्ये बरेच प्रकार उपलब्ध आहेत. बाहुबली सिनेमाच्या सेटचा भव्यपणा असणाऱ्या या प्रकारच्या मखराला धातूसारखा रंग देऊन ते अधिक आकर्षक बनवले जाते. शिवाय राजवाडय़ाची प्रतिकृती असलेले मखरही उपलब्ध आहेत. साधारण पाच हजार रुपयांपासून या मखरांच्या किमती सुरू होतात.

थर्माकोलचे मखर अजूनही बाजारात

थर्माकोलच्या मखरांचे उत्पादन थांबले असले तरीही आधीच तयार झालेल्या मखरांची विक्री मात्र थांबलेली नाही. हवा तसा आकार देऊन विविध आकर्षक कलाकुसर थर्माकोलमध्ये करता येत असल्याने अशा मखरांची खरेदी-विक्रीही जोरात सुरू आहे.

कापडाची आरास

गणेशोत्सवातील सजावट फक्त मखरावरच थांबत नाही. मखराच्या मागची भिंत आणि संपूर्ण घर सजवायचे असेल तर अनेक निरनिराळ्या प्रकारचे पडदे खरेदी केले जातात. कोरिया कापड, लायक्रा, चौकोनी टिकल्या किंवा गोल टिकल्या असलेले कापड, केळीच्या पानाचे चित्र असणारे कापड, वेलव्हेट इत्यादी साहित्याची खरेदी गणपतीच्या मागची भिंत सजवण्यासाठी केली जाते आहे. यांच्या किमती ५० ते २०० रुपये प्रतिमीटर पर्यंत आहेत. याशिवाय संपूर्ण कापडी कमानीचाही पर्याय आहे. ६ बाय ५ आकाराच्या कमानीची किंमत साधारण ६०० रुपये आहे. साधारण १५० ते ५०० रुपयांच्या दरम्यान रंगीबेरंगी आणि निरनिराळ्या नक्षीच्या लडय़ा बाजारात मिळत आहेत. कापडी फुले असलेल्या लाकडी फुलदाण्यांना ग्राहकांकडून पसंती मिळते आहे.

21
Just Now!
X