लग्नसोहळय़ातील प्रदूषण टाळून तरुण दाम्पत्याचा नवा आदर्श

मुंबई : प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा, विजेचा अतिरिक्त वापर, वाद्यांमुळे होणारे प्रदूषण अशा पारंपरिक लग्नसोहळय़ांतील रीतीला छेद देत मुंबईतील एका तरुण-तरुणीने पत्रिकेपासून पंगतीपर्यंत सारे काही पर्यावरणस्नेही होईल, अशा पद्धतीने लग्न केले. अनुराधा वाकडे आणि शार्दूल पाटील यांच्या या कृतीने पर्यावरणपूरक लग्नसोहळय़ाचा नवा आदर्श समाजासमोर उभा राहिला आहे.

अनुराधा बोरिवलीची आणि शार्दूल दहिसरचा. दोघेही व्यवसायाने वास्तुविशारद. शार्दूलचा हातखंडा मातीची घरे बांधण्यात तर, अनुराधा स्थानिक जैवविविधतेला अनुसरून काम करणारी ‘लँडस्के प आर्किटेक’. कामाप्रमाणे लग्नही पर्यावरणपूरकच झाले पाहिजे यावर दोघांचेही एकमत झाले. झाडाच्या बीजांचा समावेश असलेल्या विघटनशील कागदापासून पत्रिका तयार करण्यात आली. त्यावरील माहितीही नैसर्गिक रंगांच्या शाईने लिहिली. पत्रिका कुंडीत लावल्यास त्यातून रोपे येतील अशी सोय. त्यासंबंधीची सर्व माहिती पत्रिके वर लिहिण्यात आली. शार्दूल काम करत असलेल्या गावात पिकवलेला लाल महाडी भात एका कापडी पिशवीतून पत्रिके सोबत देण्यात आला.

शार्दूल आणि अनुराधाचे लग्न मीरारोड येथील साई पॅलेस बगीच्यात २ फेब्रुवारीला दिवसा झाले. त्यामुळे विजेचा अतिरिक्त वापर टाळता आला. वेती मुरबाड गावातील कलाकारांना सजावटीचे काम देण्यात आले. बांबू, माडाच्या पात्या आणि फुलांना नैसर्गिक रंगांत बुडवून केलेली सजावट आणखी काही वर्षे टिकू शकते. आरे वन पट्टय़ातील आदिवासी बांधवांना जेवणाचे कंत्राट देण्यात आले. पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून रोपे वाटण्यात आली. तसेच प्लास्टिक विघटनाविषयी मार्गदर्शनही करण्यात आले.

‘आम्ही लग्नाचे बरेचसे विधी घरीच केले. बागेत स्वागतसमारंभ झाला. तिथे बांबूचे छत असल्याने सावली आणि प्रकाश दोन्ही व्यवस्थित होते. त्यामुळे विजेचा वापर कमी करावा लागला. सजावट, जेवण याची जबाबदारी डहाणूच्या गावांतील कलाकार आणि कामगारांनी घेतल्याने सर्वसाधारण लग्नाच्या केवळ २५ टक्केच खर्च आला. आमचे पालक  पुढारलेल्या विचारांचे असल्याने त्यांनीही सहकार्य केले’, अशी माहिती अनुराधा यांनी दिली.