‘एमआयडीसी’ची जागा बळकाविल्याचा आरोप
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जमिनीच्या गैरव्यवहारप्रकरणी मंत्रिपद सोडावे लागल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता राज्यातील एक ज्येष्ठ आयपीएस अधिकारीही पुण्यातील एका जमिनीच्या प्रकरणात अडचणीत येण्याची लक्षणे दिसत आहेत.
एमआयडीसीने ४ जून २०१६ रोजी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख धनंजय कमलाकर यांचा पुत्र रोहित (२३) याने २०५ कोटी रुपये किमतीचा ७६ हजार ४०० चौ. मीटरच्या भूखंडावर अन्य चार जणांच्या मदतीने अतिक्रमण केल्याचे म्हटले आहे. ही जमीन हडप करण्यासाठी रोहित आणि त्याच्या साथीदारांनी बनावट नोंदींचा वापर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
एमआयडीसीच्या पुणे कार्यालयातून मुंबईस्थित मुख्यालयात पाठविण्यात आलेल्या ११६ पानांच्या दस्तऐवजाचा ही तक्रार एक भाग आहे. ज्येष्ठ सरकारी अधिकारी आणि कमलाकर यांचे पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी यांना याबाबतची कल्पना देण्यात आली आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने या अहवालातील तपशील पाहिला आहे. रोहित आणि अन्य चौघांवर फसवणूक आणि खोटी स्वाक्षरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत कमलाकर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, माझअया पुत्राने जमीन खरेदीसाठी कर्ज उभारले, पैसे उभारण्यासाठी आपण आपल्या स्रोतांचा वापर केल्याचा दावा रोहितनेही केला आहे. सदर भूखंड हा रांजणगाव पंचतारांकित एमआयडीसी औद्योगिक इस्टेटीचा एक भाग आहे. तेथे पेप्सिको इंडिया, स्वारोव्हस्की, फियाट मोटर्स आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या बडय़ा कंपन्यांची युनिट स्थापन करण्यात आली आहेत. येथील किमान दर २४४० रुपये प्रति चौ. मीटर असा आहे. एमआयडीसीने ही जागा १९९३ मध्ये संपादित केली, असे दस्तऐवजात म्हटले आहे. रोहितने भुजंगराव ओगले, नवीन वडके, रंगनाथ वडके आणि प्रशांत ओगले यांच्यासह ही जागा २०१५ मध्ये विकत घेतली, असे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा खरेदी करार गेल्या १७ एप्रिल आणि ५ मे रोजी करण्यात आला, त्यामध्ये खरेदीदारांनी संपूर्ण जमिनीची किंमत केवळ ५६ लाख रुपये इतकीच दर्शविली आहे. रोहितने यापैकी मोठा म्हणजेच ४४ हजार चौ. मीटर जमीन खरेदी केल्याचे, तर भुजंगराव ओगले यांनी २० हजार १०० चौ. मीटर खरेदी केल्याचे दर्शविण्यात आले आहे. उर्वरित जमीन अन्य तिघांनी घेतल्याचे दर्शविण्यात आले आहे.
कमलाकर यांनी कर्ज कोठून घेतले ते सांगण्यास नकार दिला, तर ही जमीन एमआयडीसीने कधीही संपादित केली नव्हती, असा युक्तिवाद रोहित आणि भुजंगराव यांनी केला आहे.