मुंबई भाजप अध्यक्षांचा केंद्रालाच घरचा आहेर

मुंबई महापालिकेत सुमारे सत्तर हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत, केंद्र सरकारचा आर्थिक पाहाणी अहवालातील निष्कर्ष अर्धवट माहितीच्या आधारावर असल्याचे सांगून भाजप मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावरच टीकेचा नेम साधला.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात मुंबई महापालिका ही देशातील पहिल्या क्रमांकाची पारदर्शक महापालिका असल्याचे तसेच भांडवली कामांवर जास्तीत जास्त खर्च केल्याचे नमूद केले आहे. यावरून शिवसेनेत जल्लोष सुरू असून भाजपने उपस्थित केलेल्या पारदर्शकतेच्या मुद्दय़ाचेच पितळ उघडे पडले. तथापि केंद्राच्या अहवालावर बोलताना हा अहवाल अपुऱ्या माहितीच्या आधारावर असल्याचे सांगून अशा अर्धवट माहितीच्या आधारावर काढण्यात आलेल्या निष्कर्षांचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे आशीष शेलार यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत २००७ ते २०१२ या कालावधीत सत्तर हजार हजार कोटींचा घोटाळा झाला असून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा शिवसेनेचा उद्योग म्हणजे मंत्र म्हणण्यापेक्षा थुंकी उडविण्याचा प्रकार असल्याची टीकाही त्यांनी केली. सत्तर हजार कोटी रुपयांचा कोणताही ताळेबंद मांडण्यात आलेला नाही. कोणत्या कंत्राटदारांना कामे दिली, कोणती कामे करण्यात आली, कुठल्या वांद्रे पूर्व बँकेच्या शाखेत पैसे जमा करण्यात आले, याची कोणतीही एण्ट्री  करण्यात आली नसल्याची टीका शेलार यांनी केली.