05 July 2020

News Flash

खरेदीच्या मुहूर्ताला यंदा मंदीचे विघ्न

सातत्याने सोन्याच्या दरात होणारी वाढ आणि मंदीसदृश परिस्थिती याचा फटका सोने खरेदीलासुद्धा बसला.

सोने, वाहन, घर घेण्याबाबत ग्राहकांमध्ये निरुत्साह

मुंबई : अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मानक मानल्या जाणाऱ्या आणि खरेदीदारांच्या निर्णय यादीत महत्त्वाचे स्थान पटकावणाऱ्या वाहन, घर आणि सोने खरेदीवरील मंदीचे सावट दसऱ्यातही कायम होते. खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा सण महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. पण या मुहूर्ताच्या दिवशी अनेकांनी आपल्या खरेदी यादीला मंदीमुळे आखडते घेतल्याचे स्पष्ट झाले.

सर्व मौल्यवान घटकांचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी राहूनही मंगळवारच्या दसऱ्याच्या खरेदीचा उत्साह बाजारात मावळल्याचे चित्र होते. ऑगस्ट महिन्यात सोन्याचा दर ४० हजार रुपये प्रति तोळा होता, तर ऑक्टोबरमध्ये त्यात २,००० रुपयांनी घट झाल्यानंतर ऐन दसऱ्याच्या मुहूर्ताला दर ३८ हजार रुपये प्रति तोळा राहिला. सोन्याच्या किमती कमी होऊनही ग्राहकांचा सोने खरेदी करण्याचा उत्साह काहीसा कमी झाल्याचे चित्र शहरातील सराफ बाजारात दिसत होते. सातत्याने सोन्याच्या दरात होणारी वाढ आणि मंदीसदृश परिस्थिती याचा फटका सोने खरेदीलासुद्धा बसला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने खरेदीत ५० टक्क्यांनी घट झाल्याचे झवेरी बाजार येथील एका दागिने विक्रेत्याने सांगितले. दसऱ्याला अनेक ग्राहक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी करतात. या वर्षी वाहन खरेदीत ४० टक्क्यांनी घट झाल्याचे मुंबईतील मारुती, फोक्सव्हॅगन कंपनीच्या वाहन विक्री दालनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

दसरा हा शुभमुहूर्त मानला जात असल्याने अनेक ग्राहक या दरम्यान घर खरेदीही करतात. परंतु मंदीच्या धसक्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून घर खरेदीबाबत ग्राहकांची विचारणादेखील कमी झाल्याचे विक्री विभागातील मिताली म्हात्रे यांनी सांगितले. गृहनिर्माण क्षेत्रातील रेरा, वस्तू व सेवा कर, नोटाबंदी आदी अडथळे स्थिरावून आता अनेक महिन्यांचा कालावधी होऊनदेखील नव्या तसेच विकसित टप्प्यातील घर प्रकल्पांना तुलनेत यंदा कमी मागणी असल्याचे सांगितले गेले.

जळगावमध्ये मात्र उत्साह

 जळगाव :  दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव प्रति ग्रॅम २०० रुपयांनी कमी झाल्याने सुवर्णनगरी जळगावमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली.  सोमवारी येथे सोन्याचे भाव ३८ हजार ४०० रुपये प्रतिग्रॅम होते. दसऱ्याला त्यात २०० रुपयांनी घट झाली. काही दिवसांपूर्वी ३९ हजार रुपये प्रतिग्रॅमपर्यंत पोहोचलेले सोन्याचे भाव बरेच खाली आल्याने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह दिसून आला. चांदीचे भाव ४६ हजार रुपये प्रतिकिलो होते. रात्री उशिरापर्यंत सुवर्ण बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ कायम राहिली.

गृहोपयोगी वस्तूंना अधिक मागणी..

* प्रमुख वस्तू, क्षेत्र यावर आर्थिक मंदीचे सावट असले तरी दूरचित्रवाणी, भ्रमण-ध्वनी, वातानुकूलित यंत्रे, शीतपेटय़ा आदी विद्युत उपकरणांना यंदा अधिक मागणी दिसून आली.

* ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांकडून ग्राहकांकरिता खरेदीसाठी सूट-सवलती, शून्य टक्के व्याजासह कर्ज, मासिक हप्ता सवलत जाहीर करण्यात आल्या आहेत.

* बाजारपेठा, मॉल याचबरोबर ऑनलाइन वस्तूंंची खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवरही कपडे, दागिने आणि पादत्राणे अशा वस्तूंवर विविध सवलती देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2019 4:30 am

Web Title: economy slowdown hit dussehra shopping zws 70
टॅग Dussehra
Next Stories
1 एक रुपयात आरोग्य तपासणी, दहा रुपयांत जेवण!
2 आचारसंहिता कालावधीत राज्यात ४७७ गुन्हे दाखल
3 ‘रॅनिटिडिन’ची चाचणी केंद्रीय औषध नियंत्रक विभागाकडेच नाही
Just Now!
X