आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या आणखी ५५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी टाच आणली. भुजबळ यांचा गिरणा साखर कारखाना आणि २९० एकराच्या जमिनीवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. ‘प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग’ कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येते आहे. सध्याच्या बाजारभावानुसार या मालमत्तांची किंमत ५५ कोटी इतकी आहे.
यापूर्वी भुजबळ यांचे कुटुंबीयांसह वास्तव्य असलेल्या ‘ल पेटीट फ्लुयर’ या इमारतीसह दोन मालमत्तांवर सक्तवसुली महासंचालनालयाने टाच आणली होती. या मालमत्तांचा बाजारभाव ११० कोटी असल्याचा दावा महासंचालनालयाने केला आहे. त्याआधी भुजबळ कुटुंबीयांच्या खारघर येथील गृहप्रकल्पाच्या भूखंडावर सक्तवसुली महासंचालनालयाने टाच आणली होती. महाराष्ट्र सदन व अन्य प्रकरणांत सक्तवसुली महासंचालनालयाने दाखल केलेल्या काळापैसाविरोधी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्य़ांतून ही कारवाई करण्यात आली आहे. सांताक्रूझ येथील ला पेटीट फ्लुअर या आलिशान इमारतीत भुजबळ कुटुंबीयांचे वास्तव्य आहे. या इमारतीसह वांद्रे येथील हफीझा महल या इमारतीवर सक्तवसुली महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी टाच आणली. पंकज आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीने या इमारती उभारल्या आहेत. या दोन्ही इमारतींची कागदोपत्री किंमत २६ कोटी असली तरी सध्याच्या बाजारभावानुसार या इमारतींची किंमत ११० कोटी इतकी होते, असे सक्तवसुली महासंचालनालयाचे म्हणणे आहे.