लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू असतानाच या प्रकरणात सक्तवसुली महासंचालनालयाने महामंडळाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या मालकीच्या १२० कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. राष्ट्रवादी पार्टीचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आणखी एका आमदाराच्या मालमत्तेवर जप्ती आली आहे.
कदम हे ऑगस्ट २०१२ ते डिसेंबर २०१४ या काळात महामंडळाचे अध्यक्ष असताना महामंडळातील कोटय़वधी रुपयांच्या निधीचा घोटाळा केल्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ाच्या आधारे सप्टेंबर २०१५ मध्ये महासंचालनालयाने काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीत कदम यांनी इतर सदस्यांच्या मदतीने ३०० कोटींचा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाले आहे. महामंडळाचा निधी वापरण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याद्वारे मिळालेला निधी स्वत:च्या फायद्यासाठी वापरला, असेही तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी आमदार कदम यांच्यासह इतरांना अटकही करण्यात आली. आता महासंचालनालयाने कदम यांच्या तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे बोरिवलीत असलेली सदनिका, औरंगाबाग येथील शेतजमीन, बँकेतील ७६ लाखांची शिल्लक, समभाग तसेच पेडर रोड या उच्चभ्रू परिसरातील भूखंड आदी मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे.