कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता

नवी दिल्ली/मुंबई :

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केल्याने ‘ईडी’समोर पेच निर्माण झाला आहे. ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. ‘विधानसभा निवडणुकांमुळे महिनाभर प्रचारासाठी मुंबईबाहेर असेन. यादरम्यान ‘ईडी’कडून ‘प्रेमसंदेश’ आल्यास त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहता येणार नसल्याने मी स्वत:च शुक्रवारी दुपारी दोन वाजता ‘ईडी’च्या मुंबई कार्यालयात जाणार आहे’, असे पवार यांनी म्हटले होते. मात्र, कोणत्याही प्रकरणात एखाद्या व्यक्तीची किंवा आरोपीची चौकशी करण्याचा निर्णय घेणे हा तपासाधिकाऱ्याचा अधिकार असतो. या प्रकरणात ‘ईडी’ने शरद पवार यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. जोपर्यंत अधिकृतपणे चौकशीसाठी बोलाविले जात नाही, तोपर्यंत अभ्यागतांच्या चौकशीचे कोणतेही अधिकार ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना नसतात, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. यामुळे या प्रकरणात ‘ईडी’ची पंचाईत झाली आहे.

‘ईडी’च्या मुंबई कार्यालयात शुक्रवारी इतर प्रकरणांच्या तपासाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पवार यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता ‘ईडी’च्या एका अधिकाऱ्याने वर्तवली. शरद पवार यांनी स्वत:च उपस्थित राहण्याची घोषणा केल्याने ‘ईडी’ने मुंबईतील कार्यालयाबाहेर अतिरिक्त पोलीस कुमक मागवल्याचे समजते.

‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नका : पवार

पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार, मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये, असे आवाहन शरद पवार यांनी गुरुवारी ट्वीटद्वारे केले. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत पोलीस आणि शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असेही पवारांनी म्हटले आहे.