८७० कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानंतर (एसीबी) अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, समीर आणि पंकज भुजबळ यांच्यासह ४० जणांविरोधात ११,१५० पानी आरोपपत्र सत्र न्यायालयाच्या महानिबंधकांकडे बुधवारी सादर करण्यात आले आहे.
भुजबळ कुटुंबियांसह आरोपपत्रात विनोद गोएंका, असीफ बलवा, संजय काकडे यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. याशिवाय डीबी रियाल्टी, बलवा समूह, नीलकमल रिलायल्टर्स अ‍ॅण्ड प्रायव्हेट बिल्डर्स, नीलकमल सेंट्रल अपार्टमेंट एलएलपी आणि काकडे इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांनाही आरोपी बनवण्यात आलेले आहे. भुजबळ आणि अन्य आरोपींविरोधात ३० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्याचाही आरोपपत्रात समावेश आहे.
आरटीओ इमारत आणि अन्य पायाभूत प्रकल्पांमधील घोटाळ्याप्रकरणी काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) दाखल करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यंच्या आधारे भूजबळ यांच्यावर हे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.