‘ब्रेकिंग न्यूज…सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडीचा पाठिंबा’ असं ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावार दुहेरी निशाणा साधला. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठी उशीर होत आहे. यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही खोचक टीका करत भाजपावर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकांपूर्वी ईडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सत्ताधारी भाजपा ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय संस्थांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असल्याचा आरोप विरोधीपक्षांनी केला होता. राज्यात भाजपाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने विरोधकांनी पुन्हा याच मुद्द्यावरुन भाजपाला टोला लगावला आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद निर्माण झालेला असतानाच आता निवडणुकीच्या आधी ज्याप्रमाणे भाजपाने ईडीची मदत घेतली तशीच मदत आता सत्ता स्थापनेसाठीही घेणार असल्याची बोचरी टीका काँग्रेसने केली आहे.

काय आहे सचिन सावंत यांचं ट्विट –
ब्रेकिंग न्यूज –
खात्रीलायक सुत्रांची माहिती, सत्तास्थापनेसाठी भाजपाला ईडी देणार पाठींबा


दरम्यान, राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असा दावा करीत भाजपाने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १३ मंत्रीपदांची ऑफर दिली आहे. तर मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडेच राहतील असेही भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.