मुंबई : कुख्यात गुन्हेगार दाऊदचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, मिर्चीसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार केलेले नसल्याचे स्पष्टीकरण देत निवडणुकीच्या तोंडावर हे राजकीय षङ्यंत्र असल्याचा आरोप पटेल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

वरळीत ‘सीजे हाऊस’ या इमारतीची पुनर्बाधणी पटेल यांच्या कंपनीने केली होती. या इमारतीमध्ये दाऊदचा विश्वासू सहकारी इक्बाल मिर्ची याच्या पत्नीच्या नावे सदनिका आहे. मिर्ची याची पत्नी हजरा मिर्ची हिने पटेल यांच्या कंपनीशी व्यवहार केला होता. तसेच सदनिका खरेदीच्या करारावर प्रफुल्ल पटेल आणि हजरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दाऊदच्या सहकाऱ्याच्या पत्नीशी पटेल यांनी आर्थिक व्यवहार केला असून, त्यातून पटेल यांना आर्थिक फायदा झाल्याचे अंमलबजावणी संचालनालयाचे म्हणणे आहे. या व्यवहाराच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली आहे. येत्या शुक्रवारी मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास पटेल यांना सांगण्यात आले आहे. हवाई वाहतूक मंत्री असताना झालेल्या काही आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाने पटेल यांची चौकशी केली होती.

शरद पवारांनंतर पटेल

राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सहकारी बँकेतील घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने शरद पवार आणि अजित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. पवारांच्या विरोधातील गुन्ह्य़ाचा मुद्दा राष्ट्रवादीने तापवला होता. निवडणूक जवळ येऊन ठेपली असतानाच ईडीने प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. हे सारे राजकीय षङ्यंत्र असून, सत्ताधारी पक्षाकडून यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप पटेल यांनी केला. भाजपने या प्रकरणी राष्ट्रवादीवर दाऊदच्या हस्तकांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे.

पटेल यांनी  आरोप फेटाळले

इक्बाल मिर्ची किंवा त्याच्या कुटुंबीयांशी आपण कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नसल्याचे पटेल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वरळीतील जागा ही पटेल यांच्या कुटुंबीयांनी १९६३ मध्ये खरेदी केली होती. या जागेवर अतिक्रमणे झाली होती. या भूखंडापैकी काही जागेवर एम. के. मोहमद यांचा ताबा होता. मोहमद यांचा हा ताबा उच्च न्यायालयाने मान्य केला होता. मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेपूर्वी १९९० मध्ये मोहमद यांनी ही जागा इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा हिच्या नावावर हस्तांतरित केली होती, असे पटेल यांनी सांगितले. पुढे या जागेतील एक इमारत कोसळली तर दुसऱ्या इमारतीचे नुकसान झाले. या जागेवर पटेल यांच्या कंपनीने इमारत बांधली व तेव्हा जागेचे मालक या नात्याने हजरा मिर्ची यांच्याबरोबर करार करण्यात आला. या करारात कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नसल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे. ईडीने नोटीस बजावली असल्यास आपण आपली बाजू यंत्रणेपुढे मांडू, असेही त्यांनी सांगितले.