25 January 2021

News Flash

छगन भुजबळ हेच घोटाळ्याचे सूत्रधार!

भुजबळ हेच सूत्रधार असल्याचा  आरोप संचालनालयाने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.

छगन भुजबळ (संग्रहित छायाचित्र)

सक्तवसुली संचालनालय आरोपावर ठाम

मुंबई : आपण निर्दोष असून आपल्यावर अन्याय झाला असे  माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ सांगत असले तरी भुजबळांवरील आरोपांबाबत सक्तवसुली संचालनालय ठाम आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे भुजबळ हेच सूत्रधार असल्याचा  आरोप संचालनालयाने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे. छगन भुजबळ यांनी संपूर्ण घोटाळ्यात आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर केला आणि राज्य शासनाची फसवणूक केली, असा आरोपही यात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सदन आणि सांताक्रूझ-कालिना येथील राज्य ग्रंथालय या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यापाठोपाठ संचालनालयानेही दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून छगन व समीर भुजबळ यांना अटक केली. ते दोघेही सध्या जामिनावर आहेत. संचालनालयाने तिसरा गुन्हा दाखल करीत पुरवणी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. या गुन्ह्य़ात भुजबळ यांच्यासह इतर सर्वानी जामिनासाठी अर्ज तयार ठेवले होते. परंतु फक्त दिलीप खैरे हे नवे संशयित आरोपी असल्याचे स्पष्ट करीत त्यांना जामीन मंजूर केला आणि ६ ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

महाराष्ट्र सदन व इतर प्रकरणात राज्य शासनाचे ८४० कोटींचे नुकसान झाले. त्यास भुजबळ हेच जबाबदार आहेत, असे आरोपपत्रात नमूद आहे. २९१ कोटींच्या मालमत्तेचा आतापर्यंत संचालनालयाला शोध घेता आला आहे. २००७ ते २०१० या काळात १२३ कोटी रुपये सुरेश जाजोदिया, चंद्रशेखर सारडा, प्रवीण जैन आणि संजीव जैन यांच्यामार्फत विविध कंपन्यांत गुंतवून त्या मोबदल्यात समभाग घेतल्याचेही दाखविण्यात आले असले तरी हे बनावट व्यवहार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  परवेझ कन्स्ट्रक्शन या कंपनीला ७० कोटी रुपये १९ कंपन्यांकडून मिळाले आहेत तर आर्मस्ट्राँग  एनर्जी प्रा. लि. या कंपनीला १८ कंपन्यांकडून ५१ कोटी मिळाले आहेत. या नोंदीही बनावट असल्याचा आरोप आहे. उपलब्ध कागदपत्रावरून काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेत छगन व समीर भुजबळ यांनी प्रमुख भूमिका बजावल्याचा आरोप आहे. या पुरवणी आरोपपत्राची (काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद क्र. ३/१८) प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे.

काय आहे आरोपपत्रात?

छगन भुजबळ – रोखीने मोठय़ा प्रमाणात लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यांच्या व कुटुंबियांच्या ताब्यात असलेल्या कंपन्यांमार्फत काळा पैसा पांढरा केला. गुन्ह्य़ातील रकमेशी त्यांचा थेट संबंध असून बेकायदा व भ्रष्ट मार्गाचा त्यासाठी अवलंब केला. या पैशाचा वापर करून स्वत:च्या तसेच कुटुंबियांच्या नावे मालमत्ता खरेदी केली.

समीर भुजबळ – भुजबळ कुटुंबियांच्या अनेक कंपन्यांचे नियंत्रण त्यांच्याकडे होते. लाचेच्या मार्गातून मिळालेली रोकड बनावट नोंदी दाखवून विविध कंपन्यांमार्फत  फिरवली. रोखीच्या स्वरूपात आलेली रक्कम बनावट कंपन्यांद्वारे बेकायदेशीररीत्या उच्च किमतीच्या समभागांच्या स्वरूपात पुन्हा आपल्या कंपन्यांत आणली. याशिवाय रोख रकमेच्या मोबदल्यात धनादेशही मोठय़ा प्रमाणावर स्वीकारले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 2:28 am

Web Title: ed says chhagan bhujbal is the mastermind maharashtra sadan scam
Next Stories
1 लंकेशप्रकरणी जे कर्नाटक पोलिसांना जमू शकते ते राज्य पोलीस-सीबीआयला का नाही?
2 प्लास्टिकबंदी पर्यावरण रक्षणासाठी, की पक्षाचा गल्ला भरण्यासाठी?
3 मुख्यमंत्र्यांचे आता ‘मिशन सांधेबदल शस्त्रक्रिया’
Just Now!
X