आगामी निवडणुकांमध्ये दलित मतांचे विभाजन टाळण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटांना एकत्र आणण्यासाठी आता सुशिक्षित आंबेडकरी तरूण पुढे सरसावले आहेत.
रिपब्लिन नेत्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा प्रस्थापित पक्षांशी युती न करता आपापसात समझोता करून निवडणुका लढवाव्यात, यासाठी त्यांनी दलित वस्त्या-वस्त्यांमधून मेळावे, पथनाटय़ाच्या माध्यमातून जनजागृती अभियान सुरू केले आहे. फेसबूकच्या माध्यमातून एकत्रे आलेले राज्यभरातील सुमारे दोन हजार तरुण या अभियानाच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत.  
कुणी एक खासदारकीसाठी शिवसेना-भाजपशी युती करतो, तर कुणी दोन-तीन जागा मिळाव्यात म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आवतणाची वाट बघत बसतो, अशा वळचणीच्या मानसिकतेने रिपब्लिकन राजकीय चळवळीलाच लाचारीने ग्रासले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नावाने सध्या ५८ गट कार्यरत आहेत.
निवडणुकीत सारेच गट उतरतात. त्यामुळे आंबेडकरी मतांचे विभाजन होते. परिणामी कुणालाच फायदा होत नाही. प्रस्थापित पक्षांशी एक-दोन जागांसाठी युती करण्यापेक्षा सर्व रिपब्लिकन गट आणि बसपने एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात, त्यासाठी समाजात जनजागृती घडविण्यासाठी फेसबूकच्या माध्यामातून तरुण वर्ग एकत्र आला आहे.
‘फेसबूक आंबेडकराइट्स मूव्हमेंट’ या नावाने संघटित झालेल्या तरुणांनी बिगर राजकीय संघटना स्थापन केली आहे. त्यात बहुतांश उच्च शिक्षित व २० ते ३० वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातून आणि व अन्य राज्यांतून सुमारे दोन हजार तरूण सहभागी झाले आहेत. त्यात सरकारी, खासगी क्षेत्रात नोकऱ्या करणारे, तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आदी शाखांचे विद्यार्थीही सहभागी झाले आहेत.