01 March 2021

News Flash

सेमी इंग्रजी शाळांची झाडाझडती सुरू

‘सेमी इंग्रजी ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांची विटंबना आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

शिक्षक आणि पालकांतही अस्वस्थता, शिक्षण विभागाचे मात्र घूमजाव

राज्यातील सेमी इंग्रजी शिक्षण पद्धत बंद करून टाकली जाणार आहे, असे वक्तव्य थेट शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनीच केल्याच्या पाश्र्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारितील अशा शाळांची माहिती गोळा करण्यास काही जिल्ह्य़ांमध्ये सुरूवात झाली आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालकांमध्येही अस्वस्थता आहे. आता मात्र सचिवांनी घूमजाव केले असून विभागाचा असा कोणताही विचार नसल्याचा दावा केला आहे. मग शाळांची जिल्हावार चौकशी का सुरू आहे, याबाबत मात्र विभागाने कोणताही खुलासा केलेला नाही.

राज्यात सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होऊन दहा वर्षांपासून अधिक काळ लोटल्यावर आता या शाळांच्या भवितव्याबाबतच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘पदावर राहिलो तर सेमी इंग्रजी बंद केल्याशिवाय राहणार नाही,’ अशा आशयाचे वक्तव्य करून सेमी इंग्रजी बंदच करण्याचे संकेत शिक्षण सचिवांनी गेल्या आठवडय़ात दिले होते. त्यातच सेमी इंग्रजी शाळांमध्ये असलेल्या असुविधांबाबत मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार करण्यात आली.  या सर्व पाश्र्वभूमीवर अनेक जिल्ह्य़ांमध्ये सेमी इंग्रजी शाळांची माहिती गोळा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांवर गंडांतर येण्याच्या धास्तीने शिक्षकांमध्ये चिंता आहे.

२०१३ पूर्वी सुरू झालेल्या सेमी इंग्रजी शाळा, त्यासाठी देण्यात आलेले शिक्षक, शिक्षकांचे प्रशिक्षण अशा मुद्दय़ांची माहिती गोळा करण्यात येत आहे. सेमी इंग्रजी बंद करण्याच्या निर्णयाचीच ही अंमलबजावणी असल्याची चर्चा सध्या शिक्षण विभागातही सुरू आहे.

सचिव काय म्हणाले होते..

‘सेमी इंग्रजी ही मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांची विटंबना आहे. पदावर राहिलो तर दोन वर्षांत सेमी इंग्रजी बंद केल्याशिवाय राहणार नाही. अर्धे हे, अर्धे ते नको तर दोन्ही भाषा यायला हव्यात. भाषा ही संवादासाठी असते, राज्य करण्यासाठी नाही. आम्ही भाषा वापरली पाहिजे, भाषेने आम्हाला वापरू नये,’ अशा आशयाचे वक्तव्य बीड येथे झालेल्या कार्यशाळेत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले होते.

सचिव आता काय म्हणतात..?

सेमी इंग्रजी शाळा बंद करण्याबाबत सचिवांना विचारले असता गेल्याच आठवडय़ात केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी पुन्हा एकदा घूमजाव केले आहे. सेमी इंग्रजी शाळांबाबत विचारले असता, ‘माझ्याकडे या विषयावर बोलण्यासारखे काही नाही,’ असे उत्तर नंदकुमार यांनी दिले. त्यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरे..

’ प्रश्न – बीड येथील कार्यशाळेत सेमी इंग्रजी बंद करण्याबाबतचे मत तुम्ही मांडले होते. सेमी इंग्रजीबाबत तक्रारीही झाल्या आहेत. त्याबद्दल विभागाची काय भूमिका आहे?

सचिव – त्या वक्तव्याचा संदर्भ वेगळा होता. त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मुलांना मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषा चांगल्या यायला हव्यात. त्यासाठी ‘स्पोकन इंग्लिश’सारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत आणि ते चांगल्या प्रकारे राबवण्यात येत आहेत.

’ प्रश्न – सेमी इंग्रजीबाबत झालेल्या तक्रारींविषयी विभागाची काय भूमिका आहे? इंग्रजीतून शिकवणारे पुरेसे शिक्षक आहेत का?

सचिव – मला मूळ शासन निर्णय पाहावा लागेल.

’ प्रश्न – विभाग सेमी इंग्रजी बंद करण्याचा अथवा पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार करत आहे का?

सचिव – विभागाचा असा कोणताही विचार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 3:03 am

Web Title: education department collecting information on semi english schools
Next Stories
1 शिक्षण ‘पीएचडी’, वेतन मात्र ६ हजार!
2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनात ‘समृद्धी मार्गा’ला मात्र बगल
3 शिवसेनेला खूश करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न?
Just Now!
X