ऑनलाइन शिक्षणाच्या आकलनाची तपासणी
रसिका मुळ्ये, लोकसत्ता
मुंबई : ऑनलाइन वर्ग, ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ अशा उपक्रमांचा गेल्या सहा महिन्यांतील परिपाक जाणून घेण्यासाठी आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चाचणी घेणार आहे.
यंदा चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा असे वर्षांचे वेळापत्रक अमलात आलेले नाही. वर्गातील अध्यापनाप्रमाणे नाही तरी ऑनलाइन वर्गाद्वारे, दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात आला. रोज व्हॉट्सअॅप, एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विविध स्तरांवरून करण्यात येत आहे. या प्रयत्नांचे फलित जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग आता या विद्यार्थ्यांच्या चाचण्या घेणार आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या चाचण्या होतील.
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे अध्ययन निष्पत्ती निकषांच्या आधारे केले जाते. म्हणजेच इयत्तेनुसार अपेक्षित असलेली कौशल्ये विकसित झाली आहेत का याचा पडताळा करण्यात येतो. चाचण्यांच्या आधारे सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांना किती संकल्पना कळल्या आहेत, कोणती कौशल्ये विकसित झाली आहेत हे पाहिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यासाठी प्रश्न तयार केले असून खासगी कंपनीच्या सहकार्याने या चाचणीसाठी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
होणार काय? विद्यार्थ्यांना सध्या ‘शाळा बंद, अभ्यास सुरू’ या उपक्रमांतर्गत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विविध विषयांतील अभ्यास साहित्याच्या लिंक्स पाठवण्यात येतात. त्याचप्रमाणे चाचणीची लिंक पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येतील. त्यातून ऑनलाइन शिक्षणाचे आतार्प्यतचे फलित कळू शकेल.
स्वरूप कसे? या चाचणीचे स्वरूप सहामाही परीक्षा किंवा तत्सम नसेल. स्वाध्याय असतो तशा स्वरूपाची ही चाचणी असेल. याबाबत येत्या आठवडय़ात त्याबाबतचे तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे.
किती विद्यार्थ्यांनी चाचणी दिली, त्यांची किती उत्तरे बरोबर आली याची नोंद या माध्यमातून करण्यात येईल. सध्याच्या अध्यापनाच्या पद्धतीतून विद्यार्थ्यांना किती कळले आहे, विद्यार्थी कुठे आहेत याचा अंदाज येईल आणि पुढील दिशा ठरवता येईल.
– दिनकर पाटील, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 1, 2020 2:17 am