शिक्षकांना अभ्यासक्रम प्रशिक्षण चार महिन्यांनंतर

इयत्ता पहिली आणि आठवीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू होऊन चार महिने लोटल्यानंतर खडबडून जाग आलेल्या शिक्षण विभागाने आता शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वरातीमागून घोडे दामटण्यास सुरुवात केली आहे. हे प्रशिक्षण अवघ्या तासाभरात उरकण्यात येणार आहे.

यंदा पहिली आणि आठवीसाठी नवीन पाठय़पुस्तके लागू करण्यात आली. पहिलीसाठी भाषेकरिता साहित्यपेटय़ा शाळांना देण्यात आल्या असून, त्यानुसार अध्यापन व्हावे यासाठी अवघ्या चार वर्षांत पहिलीची पुस्तके बदलण्यात आली. कृतिशील शिक्षण आणि ज्ञानरचनावादाच्या संकल्पनेनुसार या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वेळापत्रकानुसार आठवीचीही पुस्तके बदलण्यात आली. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास चार महिने लोटल्यानंतर आता या पुस्तकांविषयी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे शहाणपण शिक्षण विभागाला आले आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विषयाचे प्रशिक्षण अवघ्या तासाभराच्या व्याख्यानात उरकण्यात येणार आहे. प्रक्षिणाबाबतचे व्याख्यानही शिक्षकांना प्रत्यक्ष नव्हे तर ऑनलाइन मिळणार आहे. अवघ्या तासाभराच्या व्याख्यानातून हे शिक्षकतज्ज्ञ कसे होणार आणि विद्याथ्र्थाना कसे शिकविणार असा सवाल शिक्षक आणि मुलांच्या पालकांनाही पडला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) हे प्रशिक्षण देणार आहेत. त्यानुसार इयत्ता आठवीच्या शिक्षकांना २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान, तर पहिलीच्या शिक्षकांना २७ ते २९ सप्टेंबरला हे प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील साधारण एक लाख सहा हजार शाळांमधील शिक्षकांना व्हर्चुअल पद्धतीने शैक्षणिक वाहिनीच्या (डीडी डायरेक्ट फ्री डीटीएच) प्रक्षेपणाद्वारे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षकांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाच्या अखेरीस शिक्षकाने आपला अभिप्राय सरकारने दिलेल्या लिंकवरून गुगल फॉर्मवर नोंदवावा लागणार आहे. अर्थात नेटवर्क नसल्यामुळे हा फॉर्म भरता आला नाही तर नेटवर्क मिळेल तेव्हा आपल्या शंका नोंदवाव्यात. तसेच प्रत्येक शाळेने दूरदर्शन व डीटीएच अथवा मोबाइल स्क्रीन प्रोजेक्टर, वीज किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था करावी.

ही व्यवस्था शाळेत नसेल तर दोन किंवा तीन शाळांची एकत्र तीही ‘सीएसआर’ (कंपन्यांचे सामाजिक दायित्व)च्या माध्यमातून व्यवस्था करावी, असा फतवा विद्या प्राधिकरणाच्या संचालकांनी काढला आहे.

शिक्षकांची नाराजी

राज्यात केवळ ६३ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. अनेक शाळांमध्ये अजून व्हर्चुअल प्रशिक्षणाची व्यवस्थाच नाही. तेथील शिक्षकांना हे प्रशिक्षण कसे देणार, असा प्रश्न शिक्षक उपस्थित करीत आहेत. विद्या प्राधिकरणाचा हा आणखी एक नवा उद्योग आहे. या सरकारच्या काळात कधी काहीही होऊ शकते. सरकारने शिक्षणाच्या मुळावर उठू नये एवढीच अपेक्षा आहे, अशा शब्दांत आमदार कपिल पाटील यांनी मत व्यक्त केले. ज्या शाळांमध्ये व्हर्चुअल प्रशिक्षणाची आणि मोबाइल नेटवर्कची व्यवस्थाच नाही तेथे हे प्रशिक्षण कसे देणार, असा प्रश्न राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी उपस्थित केला.

‘जिओ’ प्रेम: जिओ इन्स्टिटय़ूटमुळे चर्चेत असलेले जिओ प्रेम आता पुन्हा एकदा उजेडात आले आहे. शिक्षकांना देण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रशिक्षणाचे प्रक्षेपण जिओ टीव्हीच्या मोबाइल अ‍ॅपमध्येही पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

पहिली आणि आठवीच्या नवीन अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांना पूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यस्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्राधिकरणाने दिलेल्या लिंकवर शिक्षकांनी आपल्या शंका लेखी विचारल्यानंतर त्यांचेही निरसन केले जाणार आहे. – डॉ. सुनील मगर, संचालक, विद्या प्राधिकरण