केबीसीत पाच कोटी जिंकणाऱ्या सन्मीत सहानी मनोगत
‘बेटी म्हणजे धनाची पेटी’, ही म्हण सार्थ ठरवत मुंबईच्या सन्मीत कौर सहानी यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या खेळात पाच कोटी रुपये जिंकले आणि नवीन वर्षांतली मनोरंजन क्षेत्रातली सर्वात पहिल्या मोठय़ा घटनेची नोंद केली. घरच्या घरी शिकवणी घेणाऱ्या सन्मीत कौर यांनी बारावीनंतर लग्न झाल्यामुळे शिक्षण सोडले होते. पण यामुळे न हारता त्यांनी केवळ प्रयत्नपूर्वक ज्ञानसंपादन करून या विजयाला गवसणी घातली आहे. आता या रकमेतून आपण आपल्या मुलींना खूप शिकवणार असल्याचे सन्मीत आवर्जून सांगतात. सन्मीत कौर सहानी यांनी रचलेला हा इतिहास सर्वाना १२ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या भागात पाहता येणार आहे. विशेष म्हणजे सन्मीत कौर या पाच कोटी जिंकणाऱ्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत.
मूळच्या चंदिगढच्या असलेल्या सन्मीत कौर लग्नानंतर मुंबईत आल्या. त्या वेळी त्या केवळ १८ वर्षांच्या होत्या. आजोबा आजारी असल्याने त्यांच्या हयातीतच नातीचे लग्न व्हावे, ही त्यांची इच्छा होती. त्यामुळे बारावीपर्यंत झालेले शिक्षण अर्धवट सोडून लग्न करावे लागले. त्यानंतर संसाराला लागल्याने पदवी घ्यायची अर्धवट राहिली. मात्र शिक्षण थांबले नाही. मिळेल त्या मार्गाने आपण शिकत गेलो आणि ज्ञान मिळवत गेलो, असे सन्मीत कौर सांगतात.
या ‘ज्ञान मिळविण्याच्या’ प्रक्रियेत आपल्या मुलींनी आपल्याला मदत केली, असेही त्या आवर्जून सांगतात. इंटरनेटच्या माध्यमातून मुलींनी ज्ञानाचा महासागर आपल्यासमोर उघडा केला. तसेच आपण शिकवणी घेत असल्याने मिळविलेल्या ज्ञानाची उजळणी करण्याची सवयही लागली. पुस्तके, वर्तमानपत्रे यांचे नियमित वाचन केल्याने आपल्याला अनेक विषयांमधील अनेक गोष्टींची माहिती झाली, असेही त्यांनी सांगितले. आता आपण जिंकलेल्या पैशांतून धर्मात सांगितल्याप्रमाणे काही रक्कम ही सामाजिक कार्यासाठी दान करणार आहे. मात्र हे दान शक्यतो गुप्त ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल, असे सन्मीत कौर यांनी स्पष्ट केले.