शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची इयत्ता १०वी आणि १२वी उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिकेची प्रत देण्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने नकार दिल्याने मंत्र्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत संशयाचे वातावरण तयार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी केला आहे.
तावडे यांनी पुण्याच्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून बी. ई. पदवी मिळविल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केले असले तरी हे विज्ञापीठ बनावट असल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. ज्ञानेश्वर विद्यापीठाला मान्यता नाही, असेही त्यांनी सांगितले. तावडे बारावीसुद्धा उत्तीर्ण नसल्याची माहिती मिळाल्यानेच माहितीच्या अधिकारात त्यांच्या १०वी व १२वीच्या गुणपत्रिकांसाठी अर्ज केला होता; पण संबंधित यंत्रणेने तावडे यांच्या दबावामुळे माहितीस नकार दिल्याचा आरोप मलिक यांनी केला.

नवाब मलिक काय, कोणीही आपल्याकडे आल्यास इयत्ता १२वीचे मंडळाचे प्रमाणपत्र दाखविण्याची तयारी आहे. मंडळाच्या नियमानुसार त्रयस्थाला गुणपत्रिकेची प्रत दिली जात नाही. स्वत: परीक्षार्थीने अर्ज केला तरच ती प्राप्त होते. यामुळेच मंडळाने ही माहिती नाकारली असावी.
– विनोद तावडे, शिक्षणमंत्री