16 December 2017

News Flash

राज्यात शिक्षणांधळे वाढले

पाचवीच्या मुलांना दुसरीचेही धडे वाचता न येणे आणि तिसरीच्या मुलांना हातच्याचे वजाबाकीचे गणित सोडविता

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 18, 2013 5:56 AM

पाचवीच्या मुलांना दुसरीचेही धडे वाचता न येणे आणि तिसरीच्या मुलांना हातच्याचे वजाबाकीचे गणित सोडविता न येणे हे महाराष्ट्रातील शिक्षणाच्या दर्जाबाबतचे दुदैवी चित्र ‘असर’ या ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाचा लेखाजोखा मांडणाऱ्या पाहणीत समोर आले आहे.
दुसरीला असलेले समई, कैरी, मौज हे शब्द पाचवीच्या ४१.७ टक्के विद्यार्थ्यांना धडपणे वाचता आले नाहीत. तिसरीच्या ७६ टक्के मुलांना ७६ वजा ५७ हे वजाबाकीचे गणित सोडविता आले नाही. राज्यात १२ वर्षांपूर्वी पहिलीपासून इंग्रजी शिकविण्यास सुरुवात झाली. पण, पाचवीतील केवळ २१.२ टक्के मुलांनाच दुसरीतली ‘व्हेअर इज युअर हाऊस’ किंवा ‘धिस इज टॉल ट्री’ अशी वाक्ये वाचता आली. त्यात पुन्हा २१.२ टक्क्यांपैकी केवळ ५९ टक्के विद्यार्थ्यांनाच आपण वाचलेल्या वाक्याचा अर्थ सांगता आला हे विशेष. राज्यातील विद्यार्थ्यांची भाषेबरोबरच गणिताच्या आकलनाबाबतची स्थिती भयावह आहे.

वाचनक्षमतेची देशातही बोंबच
शिक्षण हक्क कायद्यामुळे देशभरात पटनोंदणीचे प्रमाण वाढून मोठय़ा संख्येने शाळाबाह्य़ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली असली तरी शाळांमधली गुणवत्तेचा दर्जा वधारण्याऐवजी खालावला आहे. देशभरात सहा ते १४ वर्षे वयोगटातील ९६ टक्क्यांपेक्षा अधिक मुले शाळेच्या पटावर नोंदविली गेली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रमाणात ३.३ टक्क्यांनी वाढ आहे. मुलींची नोंदणी होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. पण, मुलांची खालावलेली वाचनक्षमता ही देशाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. २०१० साली दुसरीचा मजकूर वाचू न शकलेली देशभरात ४६.३ टक्के मुले होती. या वर्षी हे प्रमाण वाढून ५३.२ टक्क्यांवर गेले आहे.

First Published on January 18, 2013 5:56 am

Web Title: education quality in maharashtra government school not upto the mark
टॅग Education,School