बदललेल्या अभ्यासक्रमाचा समावेश नसल्याचे उघड

बदलणाऱ्या अभ्यासक्रमाचा विचारच केला गेला नसल्याने महापालिका शाळांमधील नववीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षांत टॅब मिळण्याची शक्यता दुरावली आहे. महापालिका शाळांमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे हे तिसरे वर्ष असून आधीच्या दोन वर्षांतही इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांना पहिल्या सत्रात टॅबचे दर्शन झाले नव्हते.

शिवसेनेने महत्त्वाकांक्षी योजना म्हणून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना टॅब देण्याची घोषणा केली. मात्र या योजनेने तिसऱ्या वर्षीच गटांगळ्या खाण्यास सुरुवात केली आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी ऑगस्ट २०१५ मध्ये ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेण्यात आला. यानुसार टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला टॅब पुरवण्याचे काम देण्यात आले. पहिल्या वर्षी प्रस्ताव उशिरा मंजूर झाल्याने तर दुसऱ्या वर्षी चीनवरून मागवण्यात येणाऱ्या बॅटरीच्या प्रमाणपत्रांची समस्या आल्याने विद्यार्थ्यांना टॅब उशिरा मिळाले. यावेळी नववीचा बदललेला अभ्यासक्रम नव्या टॅबमध्ये घालण्याची व्यवस्थाच नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आधीच्या कंपनीला दिलेले तीन वर्षांचे कंत्राट मध्येच रद्द करण्यात आले. त्याऐवजी नव्या कंपनीला टॅब पुरवण्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. नववीच्या १३ हजार विद्यार्थ्यांसाठी टॅब पुरवण्याच्या या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली.

आता काढलेल्या निविदा उघडण्याची मुदत उलटून गेल्यावरही निविदा उघडण्यात आलेल्या नाहीत. ‘टॅबसाठी मागवण्यात आलेल्या निविदा २३ ऑक्टोबर रोजी उघडणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता १ नोव्हेंबर रोजी निविदा उघडल्या जातील, त्यानंतर स्थायी समितीत प्रस्ताव संमत झाल्यावर कार्यादेश काढून

विद्यार्थ्यांना टॅब वितरित केले जातील,’ अशी माहिती पालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली. मात्र या सर्व प्रक्रियेला किमान दोन ते तीन महिने लागणार असून या शैक्षणिक वर्षांत नववीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे दर्शन होणे कठीणच दिसत आहे.

टॅबचा ताप

  • ऑगस्ट २०१५ मध्ये स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना टॅब मिळेपर्यंत जानेवारी उजाडला.
  • २०१६मध्ये आठवीतून नववीत जाणाऱ्या मुलांना त्यांच्याच जुन्या टॅबमध्ये नववीचा अभ्यासक्रम घालून देण्यात आला. ‘ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड’ने (बीआयएस) बॅटरीसाठी प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय टॅब वितरित करता येत नसल्याने आठवीच्या विद्यार्थ्यांच्या हाती टॅब उशिरा आले.
  • दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दोन वर्षे जुना टॅब देण्यात आला. तसेच नववीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे टॅब आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटण्यात आले.

ऑनलाइन निविदा यंत्रणा बंद

महापालिकेची ऑनलाइन निविदा प्रणाली १६ ऑक्टोबरपासून बंद आहे. दिवाळीच्या सुट्टय़ांमुळे किमान १५ दिवस ही यंत्रणा ठप्प असून ती सुरू होण्यासाठी १ नोव्हेंबर उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दरम्यानच्या काळात पालिकेकडून मागवण्यात येत असलेल्या ऑनलाइन निविदा रखडल्या आहेत.