उद्धव ठाकरे यांचे शिक्षण विभागाला निर्देश

मुंबई : प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तरी जूनपासून विद्यार्थ्यांचे विविध माध्यमांतून शिक्षण सुरू करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ठाकरे यांनी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, विभागातील अधिकारी, तज्ज्ञ, संघटनांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर रविवारी बैठक घेतली. ‘विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणे योग्य नाही. शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तरी ऑनलाइन, ऑफलाइन अशा सर्व शक्यतांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू करण्यात यावे. जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू व्हावे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करण्यात याव्यात. सध्या विविध प्रणालींचा वापर करून ऑनलाईन शिक्षण सुरू करावे. मात्र, त्याचवेळी विभागाने नवी प्रणाली विकसित करावी,’ असे त्यांनी सांगितले. विलगीकरण कक्ष उभा करण्यासाठी घेण्यात आलेल्या शासन खर्चाने र्निजतुकीकरण करून शिक्षण विभागाच्या ताब्यात देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.