22 February 2020

News Flash

वादळी वाऱ्यांचा कोप!

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई किनारपट्टीलगत जोरदार वारे वाहत असून अधून मधून पावसाची हजेरी लागत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चर्चगेट येथे पत्रा पडून वृद्धाचा मृत्यू, वांद्रय़ात तीन महिला जखमी;

मानखुर्दमध्ये विद्युत वाहिन्यांच्या स्फोटात तिघी जखमी

पूर्वमोसमी पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यांचा परिणाम मुंबईत अनेक ठिकाणी जाणवत आहे. चर्चगेट स्थानकात सुशोभीकरणाच्या कामादरम्यान सिमेंटचा पत्रा पडून बुधवारी एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले. वांद्रय़ातही अशाच प्रकारे स्कायवॉकवरील पत्रे कोसळून तीन महिला जखमी झाल्या तर, मानखुर्द येथे विजेच्या तारांचा स्फोट झाल्यामुळे तीन महिला जखमी झाल्या.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुंबई किनारपट्टीलगत जोरदार वारे वाहत असून अधून मधून पावसाची हजेरी लागत आहे. सोमवारपासून मुंबईत हीच परिस्थिती असून बुधवारीही पावसापेक्षाही वाऱ्यांचा जोर जास्त होता.  चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीच्या सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेले अ‍ॅल्युमिनियमचे पत्रे बुधवारी दुपारी पडून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला व अन्य दोघे जखमी झाले. इमारतीवर अ‍ॅल्युमिनिअनचे तुकडे जोडून महात्मा गांधी यांचे १५ फुटी चित्र साकारण्यात आले होते. या चित्रकृतीतील सहा चौकोनी तुकडे वाऱ्यांमुळे खाली कोसळले. यापैकी एक पत्रा अंगावर कोसळल्याने रस्त्यावरून जात असलेले तीन जण जखमी झाले. यापैकी मधुकर नार्वेकर (वय ६३) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वांद्रे स्थानकातील स्कायवॉकवरील पत्रा अंगावर पडल्यामुळे मलिसा नजारत (वय ३० वर्षे), सुलक्षणा वझे (४१ वर्षे), आणि तेजल कदम (२७ वर्षे) या तीन महिला जखमी झाल्या. एस.व्ही रोड आणि नॅशनल लायब्ररी रोडच्या जंक्शनजवळ दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जखमींवर होली फॅमिली रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर पूल विभागाने स्काय वॉकवरील खिळखिळे झालेले पत्रे काढून टाकण्यासाठी एजन्सीची नेमणूक केली असून बुधवारी रात्रीपासून हे पत्रे काढून टाकण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने या स्कायवॉकवरील पत्रे काढून टाकण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

अन्य एका घटनेत, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या स्फोटामुळे तीन महिला जखमी झाल्या. मानखुर्दच्या मंडाले परिसरात बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली. वाऱ्यांमुळे या वाहिन्यांचे एकमेकांशी घर्षण होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे वाहिन्यांखाली असलेल्या दोन घरांचे पत्रे उडाले व भिंती कोसळल्या. यामध्ये स्वागता साळुंखे (२२), रंजना मुटल (३८) आणि सुशीला गुप्ता (३५) या तीन महिला जखमी झाल्या आहेत. या तिघींवर शताब्दी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

झाडांची पडझड

शहर व उपनगरांत ७० झाडे व फांद्या कोसळल्याच्या तक्रारी आल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही. पावसाची अधूनमधून हजेरी असली तरी, शहरात कुठेही पाणी साचल्याच्या तक्रारी नसल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.

पोलिसांचे आवाहन

वायू वादळ गुजरातच्या दिशेने सरकत असले तरी या वादळाच्या प्रभावामुळे मुंबईत बुधवारी दुपारपासून सोसाटय़ाचा वारा सुटला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर राहावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून केले आहे. तसेच झाडांखाली गाडय़ा उभ्या करू नये असेही आवाहन त्यांनी केले आहे.

First Published on June 13, 2019 1:34 am

Web Title: effect of the stormy weather in many places in mumbai
Next Stories
1 मुंबईकरांच्या पाणीपट्टीत किंचित वाढ
2 वाहनचालकांच्या सहनशीलतेची परीक्षा
3 ऑनलाइन सट्टेबाजीची महिलांना मोहिनी