दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील  नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राज्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून करोना बाधितांवर उपचारासाठी मुंबईत तसेच राज्याच्या अन्य भागात स्वतंत्र रुग्णालये राखीव ठेवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून देशभरातील मुख्यमंत्र्यांची संवाद साधत करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढाला घेतला. यावेळी  सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना  विनंती करून कोणत्याही परिस्थितीत  गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल ,असे आवाहन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना  लगेच मान्य करीत आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे अशी सूचना पंतप्रधानांनी अन्य मुख्यमंत्र्यांना केली.

परराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत असून तीन हजार निवारा केंद्रांतून तीन लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. भविष्यातील परिस्थितीचा विचार करून मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांंचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महानगरपालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिग मधून  एमबीबीएस च्या  विद्यार्थ्यांना करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या कक्षात मदत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.   करोनाची लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करण्यात येत असून त्यासाठी  पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये, ताब्यात घेतली आहेत.

‘टप्प्याने संचारबंदी मागे घ्या’

एकदम संचारबंदी  न उठविता राज्यातील परिस्थितीनुसार टप्य्याटप्य्याने बंदी उठविण्याबाबत निर्णय घ्यावा. कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी पंतप्रधानांनी दिल्या. आत्तापर्यंत करोनाला रोखण्यासाठी करीत असलेले प्रयत्न यशस्वी होताहेत असे दिसते पण खऱ्या अर्थाने आत्ता  लढाई सुरु झाली आहे . बंद संपले म्हणजे सर्व काही झाले नाही. सामाजिक अंतर राखण्याचे काम महत्वाचे आहे. २१ दिवसांची तपस्या वाया जाऊ देऊ नका.