‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे करोनाका सामना करते हैं,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेच्या धाडसाचे कौतुक केले.  दरम्यान,‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही करोनाच्या विरोधातील लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून, त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूचा दर कमी झालेला दिसेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरचित्रप्रणालीद्वारे संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

दररोज दीड लाखांपर्यंत चाचण्या वाढवीत आहोत. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर टेलीआयसीयू व्यवस्था सुरू केली असून येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्व राज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किमतीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसाठी राज्यात ५५ हजार पथके तयार करण्याचे ठरले होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे ५९ हजार पथके तैनात केली आहेत. मोहीम सुरू झाल्यापासून राज्यात ७० लाख ७५ हजार ७८२ घरांना भेटी दिल्या (२६ टक्के) व आरोग्य सर्वेक्षण झाले.

मुखपट्टीची सवय..

मुख्यमंत्र्यांनी मुखपट्टीची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे उदाहरण दिले. पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार. तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार. पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही, असे ठाकरे म्हणाले. पंतप्रधानांना हे उदाहरण आवडले व त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मुखपट्टी ही आपली अपरिहार्यता आहे, असे सांगितले.