News Flash

हवा प्रदूषणाने राज्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल; लहान मुलांना सर्वाधिक धोका

जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल; लहान मुलांना सर्वाधिक धोका

मुंबई/  नवी मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात केवळ हवाप्रदूषणाने ७० लाख मृत्यू पावत आहेत, तर राज्यातील ही संख्या एक लाख ८० हजार असल्याचे लॅसेन्ट हेल्थ जर्नलचा अहवाल आहे. करोना हा श्वसनाचा आजार असून या काळात प्रदूषित हवा अधिक घातक ठरत असून हवेची गुणवत्ता न गाठू शकलेली १९ शहरे राज्यात आहेत. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट असल्याचे मत बुधवारी जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दूर संवादात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. वातावरण फाऊंडेशन आणि पामबीच रोटरी क्लबने आयोजित केलेल्या या संवादात राज्यातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी भाग घेतला होता. डास प्रतिबंधक कॉइल, धूप, अगरबत्ती इत्यादींमुळे घरात होणारे प्रदूषण लहान मुलांसाठी घातक असल्याचे मत चर्चासत्रात तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.

‘वातावरण’ संस्थेने ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन केले होते. ‘आपल्या घरात हवाप्रदूषणाचे अनेक स्रोत असतात. एक डास प्रतिबंधक कॉइल सहा ते सात तास जळते. तेव्हा ती १०० सिगारेटएवढे प्रदूषण करते. धूप किंवा अगरबत्ती १५ ते २० मिनिटे जळते तेव्हा पाच कॉइलइतके  प्रदूषण करते. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी वापरली जाणारी चूलसुद्धा हवाप्रदूषणाचा घरगुती स्रोत आहे. याचा परिणाम सर्वाधिक वेळ घरात असणाऱ्या लहान मुलांच्या आरोग्यावर होतो,’ असे निरीक्षणाअंती आढळून आल्याचे पुण्याच्या ‘पल्मोके अर रिसर्च अ‍ॅण्ड एज्युके शन’चे संचालक डॉ. संदीप साळवी यांनी सांगितले.

‘जन्मापासून ते वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत मुलांच्या फुप्फुसांचा पूर्ण विकास झालेला नसतो. त्यामुळे हवाप्रदूषणाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असतो. सर्दी, खोकला, त्वचाविकार असे परिणाम मुलांमध्ये दिसून येतात. हवाप्रदूषणामुळे काही वेळा नियोजनपूर्व प्रसूती होते आणि बाळाचे वजन अत्यंत कमी असते, अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. अदिती शहा यांनी दिली.

लहान मुलांना औषध लिहून देताना आता शुद्ध हवा असे एक औषध लिहून देण्याची वेळ आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक हे जास्त वेळ घरात राहात असल्याने घरातील प्रदूषण हे त्यांना त्रासदायक ठरत असून यासाठी नियमावली तयार करण्याची आवश्यकता के.ई.एम.च्या डॉ. अमिता आठवले यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:13 am

Web Title: effects of air pollution on human health in maharashtra zws 70
Next Stories
1 टाळेबंदीत गावी गेलेल्यांची शिधापत्रिका स्थगित
2 मिठाई दुकानदारांना यंदाही पाडवा कडूच!
3 एकरकमी शुल्कासाठी शाळांकडून अडवणूक सुरूच
Just Now!
X