करोनाच्या धास्तीने कर्मचारी गैरहजर; २० ते २५ टक्के च बस फेऱ्या

मुंबई : करोनाबाधित, त्यांच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात जावे लागलेल्या आणि करोनाच्या धास्तीने गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या मुंबई महानगरात एसटी  सेवा पुरविण्यात मर्यादा येत आहेत. फे ऱ्या कमी झाल्याने या भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. मंगळवारी मुंबई विभागातील पाच आगारांमध्ये मिळूण ७५ ते ८० टक्के फेऱ्याही होऊ शकल्या नाहीत.

मुंबई विभागातील एकूण ७६ बाधितांमध्ये कुर्ला नेहरू नगर, मुंबई सेंट्रल व परळ आगारातील कर्मचारी अधिक आहेत.

जून महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ापासून एसटी महामंडळात मोठय़ा संख्येने करोनाबाधित कर्मचारी आढळू लागले आहेत. त्यांच्या संपर्कात आल्याच्या धास्तीने काही कर्मचारी गैरहजर राहिले. मध्यंतरी ठाणे, पनवेल आगारातील एसटी सेवेवर परिणाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले होते. आता हा परिणाम आणखी वाढू लागला आहे. एसटीतील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई सेन्ट्रल, कुर्ला नेहरू  नगर, परळ, उरण, पनवेल या मुंबई विभागाच्या आगारातच करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ७६ पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये कुर्ला नेहरू  नगर आगारातीलच साधारण ५० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण असल्याचे सांगितले जाते. तर परळ व मुंबई सेंट्रल आगारात प्रत्येकी १० कर्मचारी आहेत. पनवेल व उरण आगारातील कर्मचारी बाधित आहेत.

त्यात करोनाच्या धास्तीने अनेक कर्मचारी गैरहजर राहात आहेत. करोनाबाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आल्याने अनेकांना विलगीकरणात जावे लागले आहे. त्याचा परिणाम एसटीच्या मुंबई परिसरातील वाहतुकीवर होत आहे. सध्या अत्यावश्यक सेवेबरोबरच खासगी सेवेतील कर्मचारीही एसटीवर अवलंबून आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचा परिणाम सोमवारपासून एसटीच्या वाहतुकीवर होण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई विभागातील पाच आगारांत मिळून साधारण २०० पेक्षा जास्त फेऱ्या होतात. मंगळवारी फक्त ५४ फेऱ्याच झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर १,१०० प्रवाशांनीच दिवसभरात प्रवास केला. थोडक्यात एसटीच्या पुरेशा फे ऱ्या होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी वेळेत मिळत नसल्याने अनेकजण रिक्षा, खासगी वाहनांचा पर्याय निवडत आहेत.

आता पाच आगारांतील चालक-वाहकांसह तांत्रिक कर्मचाऱ्यांनीही रजेचे अर्ज केले असून येत्या दोन ते तीन दिवसांत एसटी सेवेवर आणखी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला पाहिजे. त्यांच्यावर उपचार झाले पाहिजेत यासाठी एसटी अधिकारी पुढाकार घेत नाहीत आणि मार्गदर्शनही करत नाहीत. ही गंभीर बाब आहे. करोनाबाधित कर्मचारीही वाढत असून त्यामुळे एसटी सेवेवरही परिणाम होत आहे. 

– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र.एस.टी.कर्मचारी काँंग्रेस