गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवादरम्यान सार्वजनिक उत्सव मंडळांकडून होणाऱ्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी विशेष दक्षता पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती ‘बेस्ट’तर्फे मंगळवारी न्यायालयात देण्यात आली.
या सार्वजनिक उत्सव मंडळाकडून सर्रास वीजचोरी केली जात असल्याचा केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे न्यायालयासमोर आणला होता. तसेच वीजचोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्याला आळा घालण्यासाठी विशेष दक्षता पथके स्थापन करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. गेल्या वेळच्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकार, राज्य वीज नियामक मंडळ आणि ‘बेस्ट’ यांना या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती पी. व्ही. हरदास आणि न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी केवळ ‘बेस्ट’तर्फे उत्तर दाखल करण्यात आले. त्यात गणेशोत्सव व नवरात्रौत्सवात उत्सव मंडळाकडून केल्या जाणाऱ्या वीजचोरीला आळा घालण्यासाठी विशेष दक्षता पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘बेस्ट’च्या दक्षता विभागाचे अधीक्षक गिरीश देशमुख यांनी हे प्रतिज्ञापत्र केले आहे. ‘बेस्ट’चे स्वत:चे दक्षता पथक असून त्यात ६० अनुभवी आणि उच्च शिक्षित अभियंते तसेच सहायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना सेवानिवृत्त अधिकारी तसेच पोलीस मदत करणार आहेत. या दक्षता पथकाकडे अत्याधुनिक यंत्रे, डिजिटल कॅमेरा असणार आहेत. तसेच महाव्यवस्थापकाकडून त्यांना थेट आदेश देण्यात येतील.
गेल्या पाच वर्षांत दक्षता विभागाने वीजचोरीप्रकरणी २.६४ लाख रुपयांचा दंड सार्वजनिक उत्सव मंडळांकडून वसूल केला आहे. तसेच २००३-०४च्या तुलनेत २०११-१२ या वर्षांत वीजचोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून २००३-०४ या वर्षांत ३४१ गुन्हे, २०११-१२ या वर्षांत २ हजार १८६ वीजचोरीचे गुन्हे नोंदविण्यात आल्याचा दावाही ‘बेस्ट’ने प्रतिज्ञापत्रात केला आहे.