रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न
कोकणातील बहुजन समाजाची खोती पद्धतीसारख्या गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक लढय़ाला यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त चिपळूण येथे १६ व १७ मे रोजी अमृत महोत्सवी परिषदेचे आयोजन करण्यात आले असून भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, ज्येष्ठ नेते रा.सू. गवई, ज.वि.पवार, डॉ. राजेंद्र गवई आदी नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात
आहे.
कोकणातील खोती पद्धतीत लहान कुळांची पिळवणूक होत होती. त्याविरुद्ध झालेल्या प्रदीर्घ आंदोलनाचे नेतृत्व खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. आंबेडकरांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने १९३८ मध्ये मुंबई विधानसभेत खोती पद्धतीच्या गुलामगिरीतून बहुजन समाजातील शेतकऱ्यांची मुक्तता करण्यासाठीचे विधेयक मांडले होते. त्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी १६ मे १९३८ रोजी चिपळूण येथे भव्य परिषद घेतली होती. त्याला येत्या १६ मेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.
खोती पद्धतीविरुद्धच्या लढय़ाचे स्मरण म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नेते अॅड. दयानंद मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली येत्या १६ व १७ मे रोजी दोन दिवस अमृतमहोत्सवी परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील नेते, विचारवंत, कार्यकर्ते यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परिषदेत देशातील राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्यात रिपब्लिकन नेत्यांबरोबरच, खासदार भालचंद्र मुणगेकर, निलेश राणे, हुसेन दलवाई, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, शिवसेनेचे नेते अनंत गिते, रामदास कदम, आदी सर्वपक्षीय नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मोहिते यांनी दिली.