मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; प्रभागनिहाय समित्यांची नोंदणी करण्याची सूचना

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना स्वयंसेवी संस्थांनी विशेषत: झोपडपट्टय़ांमध्ये प्रभागनिहाय समित्या स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना करोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. त्यांनी महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांना प्रभागनिहाय या समित्यांची नोंदणी करण्याची सूचनाही दिली.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतील झोपडपट्टी भागात करोना संसर्ग थांबविणे, तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर उपचार करण्यासंदर्भात मुंबई महापालिका अधिकारी आणि स्वंयसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी दूरचित्र संवादाच्या माध्यमातून संवाद साधला. परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय.एस. चहल, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरिक आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारी स्वयंसेवी संस्थांची ही यंत्रणा कायमस्वरूपी मुंबईत कार्यरत राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनात एकजूट असेल, तर आपण करोनाचे संकट नक्कीच परतवून लावू. संसर्ग झालेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याचे काम महापालिका करीत आहेच, पण पालिका यंत्रणा कमी असेल, तेथे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे काम करण्यात यावे. प्रत्येक वस्तीमधील नागरिकांची तपासणी केली जावी, त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरवण्यात यावे.

करोना आणि पावसाळ्यातील आजार दूर ठेवण्यासाठी स्वच्छतेच्या, मुखपट्टय़ा, सॅनिटायझर वापरण्याच्या सूचनांचे पालन स्वयंसेवी संस्थांनी मुंबईतील वस्त्यांमधील लोकांकडून करून घेतले तरी आपण मुंबईला सुरक्षित ठेवू शकू. त्यादृष्टीने या संस्थांनी जनजागृती करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.