किमान बसता यावे म्हणून आठ तासांची शस्त्रक्रिया

मुंबई : मेट्रो सिनेमाजवळील खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर झाड कोसळल्यामुळे वडील गमावणाऱ्या संतोष सिंग (२६) या तरुणाला या अपघातामुळे आपले अवघे जीवन चाकाच्या खुर्चीतच व्यतीत करावे लागणार आहे. झाडाची मोठी फांदी अंगावर पडल्याने संतोषच्या कमरेखालच्या भागात पक्षाघात झाला असून त्याला बसणेही कठीण बनले होते. मात्र त्याला किमान हालचाल करता यावी, यासाठी जीटी रुग्णालयात गुरुवारी आठ तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली.

‘संतोषच्या मणक्यामध्ये पाच ठिकाणी अस्थिभंग झाला असून त्यांच्या पायाच्या घोटय़ाजवळही गंभीर दुखापत आहे. अशा रुग्णाला बसणे ही शक्य नसल्यास एकाच जागी झोपल्याने अंगावर जखमा होणे, छाती आणि फुप्फुसांमध्ये संसर्ग होणे अशा व्याधी सुरू होतात. सोबतच मानसिकदृष्टय़ाही व्यक्ती खचत जाते. संतोषच्या बाबत हे होऊ नये. चाकाच्या खुर्चीवर बसून का होईना शरीराची हालचाल व्हावी, यामुळेच ही शस्त्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले,’ असे जीटी रुग्णालयातील अस्थिभंग विभागाचे प्रमुख डॉ. धीरज सोनावणे यांनी सांगितले.

संतोषच्या पाठीचा मणका आणि कमरेच्या भागामध्ये एकूण २२ स्क्रू आणि चार रॉड बसविले गेले. गुरुवारी सकाळी १० वा.पासून सुरू झालेली शस्त्रक्रिया संध्याकाळी ६  वाजता संपली. संतोषच्या छातीमध्ये संसर्ग झाला होता. त्याच्या फुप्फुसांमध्ये रक्त जमा होत होते. हे रक्त काढण्याची प्रक्रिया आधी काही दिवस सुरू होती. त्यामुळे त्याच्या फुप्फुसाची शक्ती क्षीण झाली होती. त्यामुळे सलग आठ तासांच्या शस्त्रक्रियेमध्ये त्याला दिलेली भूल उतरण्याची शक्यता होती. तेव्हा भूल कायम राखून शस्त्रक्रियेदरम्यान होणार रक्तप्रवाह आदी धोके असताना ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या शस्त्रक्रियेनंतर संतोषला बसविण्यात येईल तसेच त्याच्या हाताच्या जखमेत सुधारणा होत आहे, डॉ. सोनावणे यांनी सांगितले.

उपचार खर्चाची मागणी

पालिकेच्या दुर्लक्षतेमुळे संतोषचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. पालिकेने किमान त्याच्या उपचारावर होणारा खर्च तरी नुकसानभरपाई म्हणून द्यावा. सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असले तरी आत्तापर्यंत सुमारे ६० हजार रुपये खर्च झाला आहे. घरामध्ये आता उत्पन्नाचे साधन नसताना हा खर्च कसा भरून काढायचा याचीच चिंता लागली असल्याचे संतोषची बहीण रेणू सिंग यांनी सांगितले.