खासगी शिकवणीला जोडलेल्या ८ कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली असून विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात सामावून घेण्यात येणार आहे.

खासगी शिकवण्यांना जोडण्यात आलेली महाविद्यालये विविध कारणांनी गेली अनेक वर्षे वादग्रस्त आहेत. स्वयंअर्थसाहाय्यित शिक्षणसंस्था म्हणून शिकवण्यांनी महाविद्यालये सुरू केली. पायाभूत सुविधा, शिक्षकांचे प्रमाण अशा निकषांची पूर्तता करण्याच्या अटीवर महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली. या अटी पूर्ण न करू शकल्याने मुंबई विभागातील ८ महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये राव एज्युकेशन ट्रस्टची अंधेरी, खारघर, सायन या ठिकाणी असलेली महाविद्यालये, पेस एज्युकेशन ट्रस्टचे खारघरचे महाविद्यालय, लक्ष्य हायस्कूल, बोरिवली आणि ठाणे या महाविद्यालयांचा समावेश आहे. मान्यता रद्द करण्यात आलेल्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना मनस्ताप : यातील काही महाविद्यालये ही दोन वर्षांहून अधिक काळ सुरू आहेत. महाविद्यालयाला मान्यता नसल्याने यंदा बारावीच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयातून परीक्षेला बसविण्याची वेळ आली होती.