02 March 2021

News Flash

शीव-पनवेल महामार्गावर आठ पदरी बोगदा

शीव-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर रस्ता या दोन्ही मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते.

प्रस्तावित प्रकल्पमार्ग

|| संजय बापट

नवी मुंबईतील अंतर्गत वाहतुकीमुळे शीव-पनवेल महामार्गावर होणारी कोंडी दूर करण्यासाठी तुर्भे ते खारघरदरम्यान सहा किमी लांबीचा बोगदा तयार करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. या आठ पदरी बोगद्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुसाट होणार असून वाहनांचे किमान दोन तास वाचण्याची चिन्हे आहेत. या बोगद्याची तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता तपासण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्तीही करण्यात आली आहे.

शीव-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर रस्ता या दोन्ही मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. त्यातही अवजड वाहनांमुळे या रस्त्यावर गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडतात. पावसाळय़ात रस्त्यावरील खड्डय़ांमुळे या मार्गावर वाहनांचा वेग मंदावतो व वाहनांची मोठी रांग लागते. परिणामी मुंबईहून पुणे, कोकण, गोवा या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसतो.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या मार्गावरील वाहतूक कोंडीवर झालेल्या चर्चेनंतर पर्यायी व्यवस्थेचा शोध घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले होते. त्यानुसार तुर्भे-खारघर दरम्यान पारसिक डोंगरातून आठ पदरी बोगदा बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे सहा किलोमीटर लांबीच्या आठपदरी बोगद्यामुळे वाहनांना सानपाडा, नेरुळ, बेलापूर या भागाला वळसा घालून थेट जाता येईल. त्यामुळे अंतर आणि वेळेची बचत होणार आहे. या बोगद्याची जबाबदारी सरकारने राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपविली असून त्यासाठी आवश्यक तांत्रिक आणि वित्तीय मदत करण्याची जबाबदारी सिडको आणि औद्योगिक विकास महामंडळावर सोपविण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार महामंडळाने स्तूप कन्सल्टंट यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून प्रकल्पाच्या तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यतेबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल. हा अहवाल दोन-तीन महिन्यात अपेक्षित असल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:01 am

Web Title: eight line tunnel in navi mumbai
Next Stories
1 ‘व्हीजेटीआय’मध्ये ‘इनक्युबेशन सेंटर’!
2 राज्याची लोकांकिका आज ठरणार
3 VIDEO: धक्कादायक ! सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळताना विद्यार्थ्याचा मृत्यू
Just Now!
X