गेल्या आठ महिन्यांत जमा न झालेला भविष्य निर्वाह निधी अखेर मुंबई विद्यापीठाच्या अस्थायी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे वजा करूनही भविष्य निर्वाह निधीत ती रक्कम जमा न झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतर पंधरा दिवसांतच विद्यापीठाने ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा केली आहे.

विद्यापीठाने रखडवलेला २००९ ते २०१६ या आठ वर्षांतला भविष्य निर्वाह निधी मिळवण्यासाठी अस्थायी कर्मचाऱ्यांचा झगडा सुरू आहे. दरम्यान विद्यापीठाने २०२० या वर्षांतील जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांचाही भविष्य निर्वाह निधी जमा न केल्याची सूचना भविष्य निर्वाह निधी संस्थेकडून कर्मचाऱ्यांना मिळाली.

विद्यापीठाने मात्र कर्मचाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम वजा केली होती. १२०० कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेले हे लाखो रुपये गेले कुठे, असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला होता. त्याला लोकसत्तातून वाचा फु टल्यानंतर विद्यापीठाकडून तातडीने सूत्र हलवण्यात आली. आठ महिन्यांची न भरलेली रक्कम विद्यापीठाकडून जमा करण्यात आल्याचा संदेश मंगळवारी निर्वाह निधी संस्थेकडून कर्मचाऱ्यांना मिळाला. त्यानंतर विद्यापीठ कामगार संघाचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी लोकसत्ताचे आभार मानले. ही रक्कम मिळाली असली तरी लढा थांबलेला नाही. उर्वरित आठ वर्षांंच्या रखडलेला निधी कर्मचाऱ्यांना मिळेल तेव्हाच न्याय होईल, असेही ते म्हणाले.