|| संदीप आचार्य

हृदयविकारग्रस्तांसाठी आरोग्य विभागाची योजना

मुंबई : गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. तरुण वयात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने तब्बल ८० कोटी रुपये खर्चून आठ मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक ‘कॅथलॅब’ सेंटर सुरू करण्याची योजना हाती घेतली आहे.

हृदयविकारग्रस्तांना वेळीच उपचार मिळाल्यास त्यांना वाचवणे शक्य होणार असल्याचे आरोग्य विभागाने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे. यासाठी दोन महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाने ‘स्टेमी’ नावाचा उपक्रम राबवला. त्याअंतर्गत विभागाच्या १२० रुग्णालयांत ईसीजी मशीन देण्यात आले आहे. हृदयविकाराची तक्रार असलेल्या रुग्णाचा ईसीजी काढून हृदयविकाराची समस्या आढळून आल्यास तात्काळ योग्य ती औषधे दिली जातात. तसेच रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून २४ तासांत नजीकच्या हृदयरोग उपचार केंद्रात हलवले जाते.

याबाबत आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले, की १९९० च्या दशकात वेगवेगळ्या आजारांनी मरण पावणाऱ्यांत हृदयविकाराने मरण पावणाऱ्यांचे प्रमाण हे सातव्या क्रमांकावर होते. मात्र २०१६ मध्ये हृदयविकाराने मृत्यू होण्याचे कारण प्रथम क्रमांकाचे बनले. वेगवेगळ्या कारणांमुळे गेल्या दोन दशकात हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून यावरील उपचार खार्चीक असल्याने आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले होते.

आरोग्य विभागाच्या नाशिक जिल्हा रुग्णालयात सध्या एक कॅथलॅब कार्यरत असून या ठिकाणी अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसह आवश्यक उपचार केले जातात. याशिवाय अमरावती जिल्हा रुग्णालयात नवीन कॅथलॅब बसविण्याचे काम सुरू झाले आहे.

अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला असताना हृदयविकार रुग्णांवरील उपचाराला प्राधान्य देण्यास सांगितले. यानुसार आरोग्य विभागाने राज्यातील आठ मध्यवर्ती ठिकाणच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये कॅथलॅब केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची योजनाही तयार केली आहे. या सुसज्ज कॅथलॅब योजनेसाठी सुमारे ८० कोटी रुपये लागणार असल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

परवडणाऱ्या दरात उपचार…

या कॅथलॅबमध्ये हृदयविकार रुग्णांवर अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीसह आवश्यक उपचार करण्यासाठी मानद हृदयविकार तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे. खाजगी रुग्णालयांत आज अँजिओप्लास्टीसाठी किमान दोन ते चार लाख रुपये खर्च येतो. सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परवडणारा नसल्याने आरोग्य विभागाच्या रुग्णालयात महात्मा फुले जीवनदायी योजना तसेच अन्य योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातील. जे रुग्ण शासनाच्या कोणत्याही योजनेत बसणारे नसतील त्यांनाही अत्यंत माफक दरात उपचार केले जातील असे या ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

येत्या काळात आरोग्य विभागाच्या ‘स्टेमी’ या योजनेची व्याप्ती वाढवली जाणार आहे. सध्या १२० रुग्णालयात ईसीजी मशीन व प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत. आगामी काळात जवळपास सर्व ग्रामीण रुग्णालयात ईसीजी मशीन बसवून हृदयविकाराच्या रुग्णांना वेळीच उपचार मिळून जीव वाचावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.