News Flash

पालिकेकडून आणखी आठ रात्रनिवारे

या माणसांना किमान रात्रीचा आसरा मिळावा यासाठी रात्रनिवाऱ्यांची सोय केली जाते.

मुंबई महापालिका (संग्रहित छायाचित्र)

उच्च न्यायालयाने अनेकदा फटकारल्यानंतर अखेर पालिकेने बेघरांसाठी आणखी आठ रात्रनिवारे सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. त्यामुळे आणखी २२९ जणांच्या रात्रीच्या निवाऱ्याची सोय होणार असून त्यात प्रामुख्याने १४ वर्षांखालील मुलांचा समावेश असेल. यातील दोन निवाऱ्यांच्या देखभालीसाठी संस्थांची निवड झाली असून इतर केंद्रांसाठी संस्था निवडीची प्रक्रिया सुरू आहे.

डोळ्यांमध्ये भविष्याची स्वप्ने घेऊन मायानगरीत दररोज दाखल होणारे शेकडो बेघर पदपथ, रेल्वेस्थानके, मैदाने, मोकळ्या जागांवर शरीराची मुटकुळी करून दिवस काढतात. या माणसांना किमान रात्रीचा आसरा मिळावा यासाठी रात्रनिवाऱ्यांची सोय केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी २०१० रोजी दिलेल्या निकालानुसार पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रति एक लाख व्यक्तींमागे १०० व्यक्तींच्या निवासाची सोय असलेल्या एका रात्रनिवाऱ्यांची गरज आहे. २०११ च्या जनगणनेनुसार मुंबईतील बेघरांची संख्या ५७,४१६ आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निकषानुसार मुंबईत ५०० हून अधिक रात्रनिवाऱ्यांची गरज आहे. या निवाऱ्यांमध्ये चटई, अंथरूण-पांघरूण, पिण्याचे पाणी व शौचालय या किमान सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र जागेच्या अडचणीचे कारण पुढे करून पालिका व राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलून रात्रनिवाऱ्यांकडे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आले आहे.

मुंबईत आजमितीला केवळ आठ रात्रनिवारे असून त्यातही पुरेशा सुविधा नसल्याने होमलेस कलेक्टिव्ह या संस्थेने उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. १८ रात्रनिवारे बांधण्याचा प्रयत्न सुरू असून राज्य सरकारकडून जमिनी किंवा रिकाम्या इमारती मिळत नसल्याचे पालिकेकडून न्यायालयाला तीन वर्षांपूर्वी सांगण्यात आले होते. या सर्व पाश्र्वभूमीवर पालिकेने आणखी आठ रात्रनिवाऱ्यांची सोय करण्यासाठी पावले उचलली आहेत.

सध्या असलेल्या आठ रात्र निवाऱ्यांमधून ३२१ जणांची राहण्याची सोय करण्यात आली असून नव्याने सुरू होत असलेल्या ८ निवाऱ्यांमधून आणखी २२९ जणांना रात्रीचा निवारा मिळ शकेल. नवीन रात्रनिवारे सुरू झाल्यानंतर ५५० जणांना रात्रनिवारा मिळू शकेल, अशी माहिती नियोजन विभागाच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी दिली.

सुरू असलेले रात्रनिवारे

 • ए वॉर्ड – वानखेडे
 • स्टेडियम जवळ – ७०
 • डी वॉर्ड – खेतवाडी – ७०
 • ई वॉर्ड – कामाठीपूरा – ३०
 • एच पश्चिम – वांद्रे प. – १२
 • के पूर्व – अंधेरी (प.)- ६१
 • एम पूर्व- मालाड (पूर्व) – ६०
 • आर मध्य – बोरिवली – १५
 • एफ दक्षिण – माटुंगा –  ३

सुरू होणारे रात्रनिवारे

 • जी / दक्षिण – वरळी
 • एफ / उत्तर – धारावी
 • डी- केनडी पूलाजवळ – २७
 • ई – जे. जे. पूलाजवळ – ४०
 • जी / उत्तर – धारावी – १२
 • जी / दक्षिण – महालक्ष्मी-५०
 • एल- अंधेरी (पूर्व)- ६०
 • पी / उत्तर – मालाड (प)- ४०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 2:47 am

Web Title: eight night houses started by bmc in mumbai
Next Stories
1 नवउद्य‘मी’ : जाहिरातीचे डिजिटल ‘तंत्र’
2 सारासार : घर का भेदी
3 सेवाव्रत लव्हाळीची : ‘आदर्श’ आश्रमशाळा  
Just Now!
X