गोरेगाव येथील प्रकल्पासह आणखी २० ठिकाणी घरे बांधण्याचा प्रस्ताव

संदीप आचार्य / निशांत सरवणकर, मुंबई</strong>

गोरेगाव येथील पहाडी गाव येथे सुरु असलेल्या सहा हजार घरांच्या प्रकल्पासोबत मुंबईत आणखी २० ठिकाणी अडीच ते तीन हजार घरे बांधण्याचे मुंबई गृहनिर्माण मंडळाने प्रस्तावीत केले आहे. मुंबईकरांसाठी २०२२ पर्यंत आठ हजार घरे अल्प गटासाठी सोडतीसाठी उपलब्ध असतील, असा विश्वास ‘म्हाडा‘तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केला.

गोरेगाव येथील पहाडी गाव परिसरात सुरु असलेला म्हाडाचा सहा हजार घरांचा हा बहुधा शेवटचा प्रकल्प आहे. हा भूखंड मिळविण्यासाठी म्हाडाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. यानंतर प्रतीक्षा नगर (सायन), मुलुंड, मालवणी, बोरिवली आदी ठिकाणी छोटे गृहप्रकल्प होऊ शकतात. त्यानंतर म्हाडाकडे घरे बांधण्यासाठी स्वत:च्या मालकीचा एकही भूखंड उरणार नाही. पुनर्विकास प्रकल्पात निर्माण होणाऱ्या घरांच्या साठय़ावर त्यानंतर म्हाडाला अवलंबून राहावे लागणार आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्येही म्हाडाचे ५० हून अधिक भूखंड अडकले आहेत. या भूखंडांचे पुनर्वसन करण्याचे म्हाडानेच ठरविले होते. परंतु अद्याप त्या दिशेने काहीही हालचाल झालेली नाही. या पुनर्विकासातूनही म्हाडाला काही हजार परवडणारी घरे मिळू शकतात, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

या पाश्र्वभूमीवर म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी म्हाडाच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर परवडणाऱ्या घरांची निर्मिती वाढावी, यासाठी बैठका घेऊन सूचना केल्या होत्या. मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी दीपेंद्रसिंग कुशवाह यांनी म्हाडा अधिकाऱ्यांना आपल्या अखत्यारित असलेले भूखंड शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या अधिकाऱ्यांनी २० भूखंड शोधून काढले आहेत. या भूखंडावर सध्या अतिक्रमणे आहेत. मात्र ती हटविता येऊ शकतात, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या २० भूखंडांवर अत्यल्प व अल्प गटासाठी अडीच ते तीन हजार घरे बांधता येऊ शकतील, असाही त्यांचा दावा आहे. या दिशेने आता मुंबई मंडळाने प्रयत्न सुरु केले आहेत. २०२२ पर्यंत या भूखंडांवरही परवडणारी घरे निर्माण होणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

उपलब्ध व्यवस्थेत घरनिर्मिती

म्हाडाने आतापर्यंत गेल्या चार वर्षांत सोडतीद्वारे मुंबईकरांना दोन ते अडीच हजारच्या आसपास घरे उपलब्ध करून दिली आहेत. या घरांसाठी दीड ते दोन लाख खरेदीदार इच्छुक होते. या सर्वाना घरे पुरविण्यासाठी म्हाडाकडे मुंबईत भूखंड नाही. मात्र उपलब्ध व्यवस्थेत आणखी आठ ते दहा हजार घरे निर्माण होऊ शकतात. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही ‘म्हाडा‘तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.