मुंबई : चित्रपट, वेब मालिका, जाहिरातीत अभिनयाची संधी देण्याचे प्रलोभन दाखवत तरुणींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या तीन आरोपींना अटक करत गुन्हे शाखेने आठ तरुणींची सुटका केली. अटक करण्यात आलेले आरोपी हिंदी चित्रपट सृष्टी आणि वेब मालिकांशी संबंधित आहेत.

वेब मालिकेचे दिग्दर्शन, निर्मिती करणारा संदिप इंगळे उच्चभ्रू वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाचे (सीआययू) प्रमुख सचिन वाझे यांना प्राप्त झाली. या माहितीची शहानिशा करून वाझे आणि पथकाने मंगळवारी पश्चिम उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घातला. त्यावेळी इंगळे याने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या आठ तरुणींची सुटका करण्यात आली.

या तरुणींकडे चौकशी के ली असता इंगळे याने स्वत:ला कास्टिंग डायरेक्टर असल्याचे भासवत वेब मालिका, मालिका, जाहिरातींमध्ये अभिनयाची संधी देण्याचे प्रलोभन दाखविले. मात्र त्यासाठी वेश्याव्यवसायाची अट घातल्याची माहिती पुढे आली. त्याआधारे इंगळेसह त्याच्या दोन साथीदार तरुणींना अटक करण्यात आली. तपासाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सुटका झालेल्या तरुणींनी जाहिराती, वेब मालिकांमध्ये छोटी मोठी कामे केली आहेत.