पाठय़पुस्तके पीडीएफ स्वरूपात समाजमाध्यमांवर उपलब्ध होत असल्यामुळे बालभारती वादात असताना आता आठवीचे इंग्रजीचे पुस्तकही व्हॉट्स अ‍ॅपवर पसरले आहे. अद्यापही आठवीची सर्व पाठय़पुस्तके बाजारात किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध झालेली नाहीत.

यंदा दहावीबरोबरच पहिली आणि आठवीची पाठय़पुस्तके बदलणार आहेत. मात्र, दहावीची पुस्तके बाजारात उपलब्ध होण्यापूर्वीच समाजमाध्यमांवर उपलब्ध झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता. पाठय़पुस्तके समाजमाध्यमांवर उपलब्ध होत असल्यामुळे बाजारात पुस्तकांआधीच गाईड्स उपलब्ध होत होती. आता दहावीनंतर आठवीचे इंग्रजीचे पुस्तकही पीडीएफ स्वरूपात व्हॉट्स अ‍ॅपवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दहावीची पुस्तके समाजमाध्यमांवर उपलब्ध झाल्याच्या प्रकरणाच्या चौकशीचे आणि गाईड्सचा बाजार रोखण्याचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, आठवीची पुस्तके बाजारात उपलब्ध झाल्याचे बालभारतीकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप इंग्रजी, हिंदी आणि गेल्या वर्षीच प्रकाशित झालेले संस्कृत हीच पुस्तके बाजारपेठेत उपलब्ध आहेत. अद्याप बहुतेक ठिकाणी किरकोळ विक्रीसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्राची पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत.

पहिलीचीही पुस्तके बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. शाळा सुरू होण्यासाठी आता अवघे दोन आठवडे राहिले असल्यामुळे शालेय साहित्य आणि पुस्तकांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढू लागली आहे. मात्र आठवी, पहिलीची पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे पालकांना हात हलवत परतावे लागत आहे. ‘सध्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये देण्यात येणारी पुस्तके तयार असून पहिल्या दिवशी ती शाळेत पोहोचावीत म्हणून त्याचे काम प्राधान्याने करण्यात आले आहे,’ अशी माहिती बालभारतीतील कर्मचाऱ्यांनी दिली.

वाहतुकीची चिन्हे, प्रथमोपचारांचीही माहिती

भाषेचा व्यवहारात वापर करता यावा यादृष्टीने तयार करण्यात येणाऱ्या कृतिपत्रिका या संकल्पनेवरच आठवीचे इंग्रजीचे पुस्तकही आधारित आहे. भाषेचा वापर करण्याची सवय व्हावी यासाठी वेगवेगळे उपक्रम पुस्तकात देण्यात आले आहेत. कविता, पाठ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित करतानाच अनेक वेगळे विषयही उपक्रमांच्या माध्यमातून पुस्तकात हाताळण्यात आले आहेत. वाहतुकीची चिन्हे, नियम, शिस्त, प्रथमोपचार, भारतीय शास्त्रीय संगीत असे विषय हाताळण्यात आले आहेत. बॅडमिंटनपटू पी. व्ही. एस सिंधू हिच्यावरील पाठाचा पुस्तकात समावेश आहे. त्याचबरोबर टायटॅनिक जहाजाची माहिती देणारा पाठही या पुस्तकात देण्यात आला आहे.