25 February 2021

News Flash

पायाभूत चाचणीचा ‘पाया’च कच्चा

आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित या विषयांची चाचणी घेण्यात येणार आहे.

पायाभूत चाचणीच्या दहा दिवस आधीच प्रश्नपत्रिकांचे वाटप करून आणि शाळांना आपल्या सोयीप्रमाणे चाचणी घेण्याची मुभा देऊन राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नैदानिक चाचण्यांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार की काय अशी भीती व्यक्त होते आहे.
‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’तर्फे (एससीईआरटी)दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा आणि गणित या विषयांची चाचणी घेण्यात येणार आहे. शाळांना प्रश्नपत्रिका वितरित केल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोयीने चाचण्या घ्यायच्या आहेत. पण, काही शाळांनी चक्क या चाचण्यांचा उद्देशालाच तिलांजली दिली आहे.
मुंबई-कोकणातील शाळांना गणेशोत्सवामुळे सुटी आहे. परंतु, उर्वरित महाराष्ट्रात पायाभूत चाचणी १४ ते ३० सप्टेंबरदरम्यान कधीही घेण्याची मुभा आहे. मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका शाळांना आधीच दिल्या गेल्या आहेत. गणिताच्याही दोन दिवसांत मिळतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे १० दिवस आधीच शाळांना प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत. थोडक्यात या प्रश्नपत्रिकांच्या आधारे विद्यार्थ्यांची चाचणीची तयारीही काही शाळा करून घेतील. काहींनी तर या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना गृहपाठ म्हणून देऊन टाकल्या आहेत. अशा परिस्थितीत चाचणी तरी कशाची घ्यायची आणि त्यातून अप्रगत विद्यार्थी शोधायचे तरी कसे, असा प्रश्न शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. खरे तर १५ दिवसांत कधीही चाचणी घ्या, असे सांगण्याऐवजी शाळांना परीक्षेकरिता एकच तारीख ठरवून द्यायला हवी होती. त्यामुळे, या परीक्षेचे उद्दिष्ट थोडय़ा फार प्रमाणात का होईना सफल झाले असते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
या चाचण्यांच्या आधारे अप्रगत मुलांचे पूरक वर्ग घेण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. पण, पायाभूत चाचणीतच इतके कच्चे दुवे राहिल्यास पुढील पूरक वर्गाचे नियोजन तरी कसे करणार? त्यामुळे, सर्व मुलांना प्रगत करण्याच्या हेतूलाच हरताळ फासला जाणार नाही का, असा सवाल त्यांनी केला. तर पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका शाळांना आधीच पाठविण्यात आल्याने त्यात गोपनीयता कशी राहील, असा प्रश्न शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.
दरम्यान एससीईआरटीईचे संचालक गोविंद नांदेडे यांनी चाचण्यांचे निष्कर्ष अपेक्षेनुसार नसले तरी कोणत्याही शिक्षक अथवा शाळेवर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. या चाचण्या मोकळ्या वातावरणात होणे अपेक्षित आहे. पुढील चाचण्या मात्र बाहेरील संस्थेकडून घेतल्या जाणार आहेत. त्यात या चाचणीच्या निष्कर्षांचीही पडताळणी होईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2015 1:09 am

Web Title: eighth std students test for language and mathematics subjects will be taken
Next Stories
1 आरोपींची शिक्षा कमी करण्यासाठी विधी आयोगाच्या अहवालाचा दाखला
2 दिवसाढवळ्या जबरी चोऱ्यांसह गुन्हे वाढले
3 पाकच्या गोळीबारात भारतीय मच्छिमार ठार
Just Now!
X