३३ टक्के कर्मचारी उपस्थितीच्या नियमात बदल करण्याची संघटनेची मुख्यमंत्र्यांना विनंती
रेश्मा राईकवार, लोकसत्ता
मुंबई : जून महिन्यापासून दूरचित्रवाणी मालिकांच्या चित्रीकरणाला अनेक नियम-अटीशर्तीच्या अधीन राहून सुरुवात झाली असली तरी ३३ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीतच चित्रीकरण करायला हवे या नियमामुळे इतर तंत्रज्ञांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कपात करण्यात आली आहे. हिंदी-मराठी मिळून नव्वद मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात २० टक्के तंत्रज्ञ, कामगारांची सेटवर वर्णी लागली आहे. खूप मोठय़ा प्रमाणात ज्युनिअर आर्टिस्ट आणि अन्य विभागांतील कामगार बेरोजगार झाले आहेत.
सेटवर चित्रीकरणाला सशर्त परवानगी देताना कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत चित्रीकरण करण्याचे बंधन निर्मात्यांवर आले आहे. हिंदीत एका मालिके च्या सेटवर कलाकार-तंत्रज्ञ मिळून १०० ते १५० लोकांचा ताफा असतो, तर मराठीतही मालिकांच्या सेटवर ७० ते ८० लोकांचा वावर असतो. आता नव्या नियमानुसार मालिके तील सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून ३३ टक्के उपस्थितीत चित्रीकरण करणे बंधनकारक असल्याने जवळपास सहा वेगवेगळ्या विभागांतील तंत्रज्ञ-कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशी माहिती ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’चे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिले आहे. ज्युनिअर आर्टिस्ट स्त्री आणि पुरुष, नृत्यविभाग, फाइट मास्टर, स्थिर छायाचित्रणकार, सेटवर छोटे-मोठे स्फोट आणि अन्य दृश्यनिर्मितीसाठी मदत करणारे अशा अनेकांना सध्या सेटवर कामासाठी बोलावले जात नाही. लाइटमनला बोलावले तर बूम धरणाऱ्याला वगळले जाते. अशा पद्धतीने काटछाट करून कमी मानधनात अनेकांकडून बारा तास काम करून घेतले जात आहे, अशी टीकाही तिवारी यांनी के ली.
आमचे निम्म्याहून कमीच तंत्रज्ञ सध्या सेटवर प्रत्यक्ष काम करत आहेत. उरलेल्या लोकांना आतापर्यंत आम्ही अर्धे का होईना वेतन देत होतो. आताही त्यांना महिन्याभराचे रेशन मिळेल, यासाठीचा खर्च त्यांना देत आहोत. पण हे आम्ही किती काळ करणार? सेटवर नियमित चित्रीकरण कधी सुरू होणार याची आम्हालाही कल्पना नसल्याने इतरांना काम कसे द्यायचे, हा आमच्यासमोर प्रश्न आहे, अशी माहिती ‘माझा होशील का’ मालिकेचे निर्माते सुबोध खानोलकर यांनी दिली. तर हा प्रश्न प्रत्येक निर्माता आपापल्यापरीने सोडवतो आहे, असे निर्माते नितीन वैद्य यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांना पत्र
३३ टक्के उपस्थितीच्या नियमात बदल करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे तिवारी यांनी सांगितले. निर्मात्यांच्या संघटनेने चित्रीकरण सुरू झाल्यावर येणाऱ्या सगळ्या अडचणींचा धांडोळा घेऊन २२ जुलैदरम्यान बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
सेटवर काम करणारे कलाकार-तंत्रज्ञ चौदा दिवस विलगीकरणात होते. त्यांच्या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर त्यांच्याबरोबर चित्रीकरण सुरू केले आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळी टीम करून विलगीकरण, तपासणी या प्रक्रिया पाळून चित्रीकरण करणे व्यवहार्य नाही.
– सुबोध खानोलकर, निर्माता
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 2:09 am