शैलजा तिवले

मुंबईत उभारलेल्या मोठय़ा करोना आरोग्य केंद्रांमधील ८३ टक्के खाटा रिक्त आहेत, तर पालिका करोना रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांमध्ये केवळ पाच टक्के खाटा शिल्लक आहेत. एकीकडे आरोग्य केंद्रांमध्ये गरजेपेक्षा अधिक मनुष्यबळ आहे, तर दुसरीकडे मनुष्यबळाअभावी अतिदक्षता विभाग सुरूच झालेले नाहीत, असेही चित्र आहे.

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने वांद्रे-कुर्ला संकुलासह वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगावमधील नेस्को मैदान, मुलुंडमध्ये रिचर्डसन अ‍ॅण्ड क्रुडास आणि दहिसर येथे मोठी करोना आरोग्य केंद्रे सुरू केली. परंतु गेल्या काही दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या तुलनेने कमी होत असल्याने सध्या या आरोग्य केंद्रांतील रुग्णसंख्याही कमी झाली आहे. या केंद्रामध्ये एकूण ५८५२ खाटा उपलब्ध आहेत. तेथे ९९४ रुग्ण दाखल असून उर्वरित ४,८५८ खाटा रिक्त आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना आरोग्य केंद्रात सध्या ३१२ रुग्ण असून जवळपास ७०० खाटा रिकाम्या आहेत. या केंद्रात १०० डॉक्टर, १२५ परिचारिका असून एक हजार खाटांसाठी पुरेसे मनुष्यबळ असल्याचे या केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले. गोरेगावमध्ये नेस्को आरोग्य केंद्रामध्ये ९१४ खाटांपैकी ४१४ खाटांवर रुग्ण दाखल आहेत. या केंद्रात १०३ डॉक्टर, १३८ परिचारिका आणि १३७ परिचारक आहेत. येथे ९०० खाटांसाठीचे मनुष्यबळ आहे. नेस्को केंद्रातील २२० खाटांच्या प्रस्तावित अतिदक्षता विभागाचे कामकाज महिनाअखेरीस पूर्ण होईल, असे केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. वरळीच्या ‘एनएससीआय’मधील ५१८ खाटांपैकी २४७ खाटा भरलेल्या आहेत. येथे सध्या ५१ डॉक्टर आणि ८५ परिचारिका कार्यरत असल्याची माहिती केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजीव जोशी यांनी दिली.

या तिन्ही आरोग्य केंद्रांमध्ये एकूण एक हजार रुग्ण दाखल आहेत, तर २५० डॉक्टर, ३५० परिचारिका एवढेमनुष्यबळही तेथे कार्यरत आहे. एनएससीआय आणि वांद्रे-कुर्ला संकुलातील दुसऱ्या टप्प्यातील करोना आरोग्य केंद्रात १२८ खाटांचा दक्षता विभाग आहे. परंतु मनुष्यबळाअभावी २४ खाटांवरच रुग्ण दाखल आहेत.

केईएम, नायर रुग्णालयांसह पालिकेच्या अन्य करोना रुग्णालयांमधील ६,११४ खाटांपैकी सध्या १२१० रिक्त आहेत. तेथील ६६७ अतिदक्षता विभागातील खाटांपैकी २७ रिकाम्या आहेत. या रुग्णालयांत ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ३,८३४ खाटा आहेत. त्यापैकी ६४५ रिक्त आहेत, तर ५१४ कृत्रिम श्वसन यंत्रणांपैकी (व्हेंटिलेटर) केवळ १४ उपलब्ध आहेत.

पालिकेने करोना रुग्णांवरील उपचारासाठी ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालयांतील ४,८९६ खाटांपैकी १,०२१ खाटा रिक्त आहेत. अतिदक्षता विभागाच्या ७२ खाटा आणि २० कृत्रिम श्वसन यंत्रणा उपलब्ध आहेत.

करोना आरोग्य केंद्रे रिक्त असली तरी आता पावसाळ्यामुळे डेंग्यू, हिवतापाच्या रुग्णांची संख्या वाढल्यावर खासगी रुग्णालयांतील खाटा उपलब्ध केल्या जातील. भविष्याच्या दृष्टीने हे नियोजन केले आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

रुग्णसंख्या वाढत असूनही..

मुंबई महानगर प्रदेशात डॉक्टर, परिचारिकांअभावी रुग्णालये पूर्णपणे कार्यरत झालेली नाहीत. या भागांतील रुग्णसंख्या वाढत असूनही तेथे अतिदक्षता विभागांमध्ये जागा नसल्याने तेथील रुग्ण मुंबईतील रुग्णालयांकडे धाव घेतात. त्यामुळे अतिदक्षता विभागांच्या खाटांची नितांत गरज असल्याचे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.