गजानन पाटील लाच प्रकरण
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा कथित सहकारी गजानन पाटील याला लाच मागितल्याप्रकरणी चौकशीची व्याप्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आधिपत्याखालील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) वाढविली जाण्याची चिन्हे असून या संदर्भातील कागदपत्रे बुधवारी ताब्यात घेतली. मात्र पाटील याला अटक केली असली तरी पैसे स्वीकारताना पकडण्यासाठी सापळा का लावला गेला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
निळजे येथील जमीन सामाजिक संस्थेसाठी देण्याकरिता ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार घेऊन रमेश जाधव यांनी सप्टेंबरपासून एसीबीचे दरवाजे ठोठावले होते. गजानन पाटीलच्या माध्यमातून खडसे यांच्या कार्यालयातील काही व्यक्तींबरोबर भेट व बोलणे गेल्या काही महिन्यांमध्ये सहा-सात वेळा झाले. एसीबीने दूरध्वनी संभाषण ध्वनिमुद्रित करून लाच मागितली गेल्याची खात्री पंचासमक्ष पटविली आहे. तरीही लाचेच्या रकमेपैकी काही रक्कम देताना सापळा रचला का गेला नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही उपस्थित केला आहे. केवळ पैशांच्या मागणीसाठीच पाटील याला नुकतीच अटक झाली, तर ती याआधी का झाली नाही, कोणाला वाचविण्याचा उद्देश होता का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी खडसे यांनीही केली आहे. खडसे यांच्या कार्यालयातील ‘उन्मेश’ यांच्या नावाचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. त्यामुळे केवळ पाटील याच्याविरुद्ध लाच मागितल्याबद्दल कारवाई करून भागणार नसून या प्रकरणाच्या मुळाशी जावे लागणार आहे. त्या दृष्टीने या प्रकरणाच्या कागदपत्रांची आवश्यकता एसीबीला असून ती आता ताब्यात घेतली गेली आहेत, असे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

खडसेंबाबत चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत खडसे यांच्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. या प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत आहे. खडसे यांच्या बाबतचे असे काही मुद्दे फडणवीस यांनी मोदींच्या कानावर घातल्याचे समजते.

जामीन अर्ज फेटाळला
निळजे (जि.ठाणे) येथे सामाजिक संस्थेसाठी जमीन देण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा ‘कथित सहकारी’ असलेल्या गजानन पाटील याला जामीन देण्यास सत्र न्यायालयाने बुधवारी नकार दिला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाटील याला या क्षणी जामीन देणे योग्य नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
जमिनीची किंमत १५० कोटी- काँग्रेस</strong>
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या निकटवर्तीयाला ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी पकडण्यात आल्यानंतर संबंधित जमिनीची किंमत पाच कोटी असताना इतकी लाच कोणी देईलच कशी, असा सवाल खडसे यांनी केला होता. रेडिरेकनरनुसार या जमिनीची किंमत १५१ कोटी तर बाजारभावाप्रमाणे ३०० कोटींपेक्षा जास्त असल्याचा दावा काँग्रेसने बुधवारी केला.