एकनाथ खडसेंचा आरोप

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आठवडाभरात पुन्हा एकदा पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिपद सोडल्यापासून गेली वीस महिने काहीच बोललो नाही. मात्र संयमाला मर्यादा आहेत. भाजपशी माझा ४० वर्षांचे नाते आहे, त्यामुळे पक्ष सोडण्याची इच्छा नाही. मला पक्षाबाहेर घालविण्याचे प्रयत्न सुरू असतील तर मी काय करणार? पक्षशिस्त केवळ माझ्यासाठीच आहे काय असा सवाल खडसेंनी केला.

माजी महसूलमंत्री असलेल्या खडसेंनी २०१६ मध्ये भ्रष्टाचार व जमिन व्यवहारातील अनियमिततेच्या आरोपावरून मंत्रिपद सोडले होते. माझ्या विरोधात जे आरोप आहे ते सार्वजनिक करा अशी पक्षाच्या नेत्यांकडे मागणी आहे. त्यात जर तथ्य असेल तर मला तुरुंगात टाका मात्र सत्य बाहेर येऊ देत असा आग्रह त्यांनी धरला आहे. तसेच पुन्हा मंत्री करा यासाठी राज्य नेतृत्वाशी चर्चा केली नसल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेस नेत्यांबरोबर जळगाव जिल्ह्य़ात एकाच व्यासपीठावर गेल्या आठवडय़ात खडसेंनी उपस्थिती लावली होती. त्याबाबत विचारले असता, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहतात तर मग मी माझ्या जिल्ह्य़ातील नेत्यांच्या वाढदिवसाला उपस्थित का राहू नये, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. माझा पदोपदी अपमान होणार असेल किंवा क्षुल्लक आरोपांवरून बाजूला केले जात असेल तर काय करावे अशी उद्विग्नता खडसेंनी व्यक्त केली.

जळगावच्या विकासाकडे दुर्लक्ष

जळगाव जिल्ह्य़ातील विकासाशी निगडित अनेत प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप खडसेंनी केला. याबाबत सातत्याने प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र सत्ताधारी पक्षाचा असताना आता काही याबाबत विरोधकांची भूमिका बजावावी अशी अपेक्षा काय असा नाराजीचा सूर त्यांनी लावला.