शेतकऱयांना मदत द्यायला, तुम्ही तिजोरीत काही शिल्लक ठेवलंय कुठं, असा सवाल विचारत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी विरोधकांचे कान टोचले.
विधान परिषदेमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ या विषयावरील चर्चेला उत्तर देताना खडसे यांनी जोरदार फटकेबाजी करीत विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले.
खडसे म्हणाले, आम्ही गेल्या सरकारमध्ये कर्ज काढून एक्स्प्रेस वे, उड्डाणपूल बांधले. तुमच्यासारखे ‘आदर्श’मध्ये पैसे जिरवले नाहीत. केंद्र सरकारमध्ये आमची पत तुमच्यापेक्षा चांगली आहे. त्यामुळे केंद्र सरकार आम्हाला पैसे देणार आहे.
राज्य सरकार पुढील काळात आणेवारीच्या पद्धतीमध्ये बदल करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, उपग्रहाच्या माध्यमातून शेतीच्या नुकसानीची आणि आणेवारीची माहिती पुढील काळात घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्य आपत्ती निवारण निधी उभारण्याबाबतही सरकार विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.