राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी शुक्रवारी हजर होणार आहेत. पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे.

खडसे यांना ईडीने ३० डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. त्यासाठी ते जळगावहून मुंबईत आले होते. पण करोना झाल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार खडसे यांनी उपचार व विश्रांती घेतली. विलगीकरणाचा कालावधी आता संपल्याने खडसे शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहून चौकशीला सामोरे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे केलेली पुण्यातील जमीन खरेदी वादग्रस्त ठरली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग, त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती डी.एस. झोटिंग यांनी याप्रकरणी चौकशी केली होती.