देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे त्यांची नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. एकाच दिवशी ४२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे खडसे यांना नाराजी व्यक्त करण्यासाठी नवाच मुद्दा मिळाला. इतर मंत्र्यांमध्येही या बदली प्रकरणावरून नाराजी असताना त्यांनी उघडपणे मतप्रदर्शन करण्याचे टाळले. परंतु महसूलमंत्री खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहूनच आपली नाराजी व्यक्त केली आहे. महसूल खात्यात चांगले काम करत असलेल्या संधू यांची बदली करताना मुख्यमंत्र्यांनी आपल्याला विश्वासातच घेतले नसल्याचा तक्रारीचा सूर या पत्रात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून ४२ सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. या बदल्या तडकाफडकी करण्यात आल्याने अनेक मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर होता. शालेय शिक्षण, सहकार, आदिवासी विकास या खात्यांमधील सचिवांच्या बदल्यांमुळे त्या त्या खात्यांचे मंत्री नाराज आहेत. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे उघड मतप्रदर्शन करणे टाळले होते. परंतु महसूल खात्याचे सचिव संधू यांच्या बदलीमुळे नाराज असलेल्या खडसे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनच नाराजी व्यक्त केली. ही बदली करण्यापूर्वी आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, असा खडसे यांचा आक्षेप आहे. खडसे यांच्या आक्षेपामुळेच महसूल खात्याच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आलेल्या मनुकुमार श्रीवास्तव यांना लगेचच पदभार स्वीकारू नये, अशी सूचना करण्यात आल्याचे समजते. शालेय शिक्षण खात्यात अश्विनी भिडे यांच्याऐवजी देवाशिष चक्रवर्ती यांची नियुक्ती केल्याने या खात्याचे मंत्री विनोद तावडे हे सुद्धा फारसे समाधानी नाहीत. मुकेश खुल्लर यांची आदिवासी विकास खात्यातील बदलीस या विष्णू सावरा यांनी विरोध केल्याचे समजते.

* महसूल खात्याचे सचिव संधू यांच्या बदलीमुळे नाराजी.
* बदली करण्यापूर्वी विश्वासात न घेतल्यामुळे आक्षेप.
* खडसे यांच्या आक्षेपामुळेच महसूल खात्याच्या सचिवपदी नियुक्त करण्यात आलेल्या मनुकुमार श्रीवास्तव यांना पदभार न स्वीकारण्याच्या सूचना.

धनगर आरक्षणाला सावरा यांचा विरोध
धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय १५ दिवसांमध्ये घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असतानाच आदिवासी विकास खात्याचे मंत्री विष्णू सावरा यांनी विरोधात भूमिका घेतली आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर समाजालाचा समावेश करू नये, अशी अपेक्षा सावरा यांनी व्यक्त केली आहे.