दोषी असेन तर फाशी द्या, पण निर्दोष असेल तर सत्य जनतेसमोर आलं पाहिजे असं वक्तव्य भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी न्यायालयाकडून क्लिन चिट मिळाल्यानंतर दिली आहे. एकनाथ खडसे यांना भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणात क्लीन चिट मिळाली असून पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.

दोन वर्षांच्या सखोल चौकशीनंतर आज सत्य बाहेर आले. मला याचा आनंद असून माझ्यावर खोटे आरोप करणारे आज तोंडघशी पडले, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आला की माझ्यावर आरोप व्हायचे, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

खडसे म्हणाले, दोन वर्ष मला आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अस्वस्थ करणारी होती. मी कोणतीही चूक केली नव्हती. त्यामुळे निर्दोष सुटणार असा विश्वास होता. कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. फक्त सुपारी बहाद्दर आणि कथित समाजसेवक माझ्या राजीनाम्याची मागणी करायचे. मी नैतिक जबाबदारी म्हणून स्वतःहून राजीनामा दिला होता. दरवेळी मंत्रिमंडळ विस्तार आला की माझ्यावर आरोप केले जायचे, असे त्यांनी सांगितले.

रामायणात सीतेलाही अग्निदिव्यातून जावं लागलं होतं, असेही खडसे यांनी सांगितले. दोन वर्षांत बरेच अनुभव आले. ४० वर्ष एका विचाराने चालत होतो. मी अनेकांना मोठं केले. कार्यकर्त्यांना पुढे आणले, असेही ते म्हणालेत. पण या काळात अनेकांनी आधार दिला. जवळच्या माणसांनी गद्दारी केली यावर मी काही बोलणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.